सोलापूर : कुटुंब निवृत्तिवेतनाची रक्कम घरात खर्च न करता भावंडांना देते म्हणून रागाच्या भरात पोटच्या मुलाने आपल्या वृद्ध विधवा आईच्या डोक्यात कुकरने जोरात प्रहार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना सोलापुरात घडली. संशयित म्हणून मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.विजयालक्ष्मी रामकृष्ण चिचणपुरे (वय ६३) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. आश्चर्य म्हणजे या घटनेनंतर त्यांच्या नातेवाइकांपैकी कोणीही पोलिसांत तक्रार नोंदवायला पुढे न आल्यामुळे घरजागा मालक अमित सुरेश धुपद यांना जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल करावी लागली.
धुपद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार पेठेतील अन्नपूर्णा गृहसंकुलात चौथ्या मजल्यावर अमित धुपद यांच्या मालकीच्या सदनिकेत जखमी विजयालक्ष्मी चिचणपुरे आपला एकुलता एक मुलगा हर्षलसोबत भाडेतत्त्वावर राहतात. त्यांचे पती रामकृष्ण सोलापूर महापालिकेत सेवेत असताना मृत्यू पावलेले. अनुकंपा तत्त्वावर त्यांचा मुलगा हर्षल यास महापालिकेत लिपीक पदावर नोकरी मिळाली होती. विजयालक्ष्मी यांना मृत पतीच्या पश्चात कुटुंब निवृत्तिवेतन मिळते. परंतु निवृत्तिवेतनाची रक्कम घरात न देता आपल्या भावंडांवर खर्च करते म्हणून मुलगा हर्षल हा आई विजयालक्ष्मी हिच्याशी सतत वाद घालायचा. आईला तिच्या नातेवाइकांपैकी कोणीही सांभाळत नाहीत. तरीही ती आपल्या निवृत्तिवेतनाची रक्कम तिच्या भावंडांनाच देते. त्याबद्दल मुलगा हर्षल याने जाब विचारला असता वाद वाढला.
यातूनच रागाच्या भरात मुलगा हर्षल याने आई विजयालक्ष्मी यांच्या डोक्यावर जाड कूकरने जोरात प्रहार केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असता त्यांना हर्बल यानेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे झालेल्या चौकशीत हा प्रकार उजेडात आला. पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे पुढील तपास करीत आहेत.