सावंतवाडी : आई आपल्याबद्दल गावातील लोकांना खोटी माहिती सांगते या संशयातून स्वतःच्या आईला मारहाण करून तिची हत्या करणाऱ्या आणि त्यानंतर ती धाप लागून मयत झाल्याची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या मुलाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय-१ च्या न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २५ ऑगस्ट २०२२ रोजी बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
आरोपी दीपक विष्णू दळवी (वय ४७, रा. विलवडे वरचीवाडी, ता. सावंतवाडी) हा त्याची आई राधाबाई विष्णू दळवी यांच्यासोबत राहत होता. आरोपीच्या मनात असा गैरसमज होता की, त्याची आई गावातील लोकांना त्याच्याविरुद्ध काहीतरी खोटेनाटे सांगत आहे. याच रागातून आरोपीने मयत राधाबाई यांच्या डोक्यावर आणि छातीवर हाताच्या ठोशांनी मारहाण करून त्यांना जीवे ठार मारले.
हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. राधाबाई यांना धाप लागून त्या बेशुद्ध पडल्याने मयत झाल्याची खोटी माहिती त्याने बांदा पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास बांदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शामराव काळे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी केला. खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात बाबाजी ठाकूर (पंच), मधुरा सावंत, श्रेया माळकर, अजित दळवी, डॉ. तुषार तुळस्कर (वैद्यकीय अधिकारी), शामराव काळे (तपासिक अधिकारी) यांना तपासण्यात आले.
न्यायालयाचा निकाल:
सर्व साक्षीदार आणि वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी दीपक विष्णू दळवी याला दोषी ठरवले आहे. भा.दं.सं. कलम ३०२ नुसार जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ७ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
