अहिल्यानगर: लेखक-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांनी कलाकारांच्या निवडीसाठी आयोजित मुलाखतीत एका प्रतिष्ठित महिलेने माझ्या त्वचेचा रंग आणि सौंदर्याचे मापदंड यावरून कठोर शेरेबाजी करून मला प्रचंड निराश केले. कर्नाड यांनी माझ्या नाटकातील कामाने प्रभावित होऊन मला दाद दिली. या अनुभवामुळे पुढील आयुष्यात अपमान आणि अपयश यांना प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार केला, एकाग्रता वाढवून काम केल्यानेच अभिनय क्षेत्रात यशप्राप्ती झाल्याचे प्रतिपादन अभिनेत्री- लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी केले.

स्नेहालय संस्थातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘अग्निशिखा पुरस्कारा’ने यंदा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना गौरविण्यात आले. सामाजिक जाणीव जपत विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना ५१ हजार रु., सन्मानपत्र, पुस्तक संच या स्वरूपाचा पुरस्कार वितरित केला जातो. इंग्लंडमधील भारताचे माजी राजदूत कमलेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्नेहालयच्या अध्यक्ष जयाताई जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंबे, विश्वस्त राजीव कुमार आदी उपस्थित होते. विश्वस्त मानसी चंदगडकर यांनी सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली.

सोनाली म्हणाल्या की, रमाई, डॉ. मंदा आपटे यांच्या भूमिका साकारल्याने माध्यमातून होणाऱ्या प्रतिमा निर्मितीचा प्रभाव अनुभवला. इटालियन चित्रपटाच्या निमित्ताने ओमर शरीफ या दिग्गज दिग्दर्शकाचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. आयुष्यात सतत पाय जमिनीवर ठेवणे आणि समाजाशी नाते जपत आपण कोणीही वेगळे आणि श्रेष्ठ नाहीत याची जाणीव ठेवणे, हे अशा अनुभवामुळे शिकता आले. असे माणुसकी सघन करणारे अनुभव हीच अभिनय क्षेत्रातील खरी कमाई आहे.

श्री. कमलेश शर्मा यांनी राजदूत म्हणून काम करताना आलेले अनुभव आणि निरीक्षणे नमूद केली. मुलांऐवजी मुलींच्या शिक्षणाला कुटुंबाने प्राधान्य दिले तर सामाजिक प्रगतीचा परिघ प्रचंड विस्तारू शकतो. राजीवकुमार यांनी प्रास्ताविक, डॉ. अंशू मुळे यांनी सूत्रसंचालन तर जयाताई जोगदंड यांनी आभार मानले. अभिजीत क्षीरसागर यांनी मानपत्राचे लेखन आणि वाचन केले.

सामाजिक कामामुळे सकारात्मकता वृद्धिंगत

आपण सामाजिक कार्यकर्ते नसून सजग कर्तव्यशील नागरिकाची भूमिका मात्र बजावत असल्याचे सांगून सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, आमिर खान यांचे पाणी फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘विनोबा ॲप’ अशा विविध सामाजिक कामांचा भाग बनल्याने स्वतःची सकारात्मकता वृद्धिंगत होत राहिली.