Abhijit Dipke statement on Sonam Wangchuk: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नुकतीच एका यूट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते आणि त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा याबाबत भाष्य केले होते. यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्ली तक’शी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, सोनम वांगचुक सीजेपीबाबत जे बोलले त्याचा ९९ टक्के भाग एडिट करण्यात आला आहे. सध्या जी क्लीप व्हायरल केली जात आहे, ती त्या मुलाखतीमधील केवळ १ टक्के इतकाच भाग होती.
काय म्हणाले अभिजीत दिपके?
कॉकरोच जनता पक्षाचे नेते भविष्यात काय निर्णय घेतील? याबाबत आताच सांगता येत नाही, असे विधान सोनम वांगचुक यांनी केले होते. या विधानाला अभिजीत दिपके यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, वांगचुक यांच्या विधानातील हा वाजवी मुद्दा होता. माझ्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे मला स्वतःलाही माहीत नाही.
सोनम वांगचुक यांच्या व्हायरल क्लीपबाबत विचारले असता दिपके म्हणाले, वांगचुक यांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि माझे कौतुकच केले होते. मात्र व्हायरल व्हिडीओत तो भाग दाखवला गेला नाही.
दिपके म्हणाले, तुम्ही कदाचित ती पूर्ण मुलाखत पाहिली नाही. त्यांना आमच्या तिघांबाबत काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच आम्हाला काही महत्त्वकांक्षा आहेत का आणि भविष्यात आम्ही भ्रष्ट होऊ का? असा प्रश्न विचारला गेला. यावर वांगचुक यांनी दिलेले उत्तर व्हायरल क्लीपमध्ये नाही. ते म्हणाले, “तिघांमध्येही चांगले नेतृत्व गुण आहेत. ते तिघेही अद्याप भ्रष्ट नाहीत. त्यांनी प्रामाणिकपणे आंदोलन हाताळले.”
तसेच सोनम वांगचुक यांनी आमच्या भविष्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. ते बरोबरच आहे. कुणालाच आपले भविष्य माहीत नसते. मी स्वतःही त्याबाबत काही सांगू शकत नाही. यामुळेच मी सर्वांना सांगतो की, कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. कारण भविष्यात कोण काय भूमिका घेईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच सोनम सर असे म्हणाले असावेत.
सोनम वांगचुक काय म्हणाले होते?
‘PGX Raw & Real’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत सोनम वांगचुक बोलत होते. “अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, मी त्यांचं खूप जवळून निरीक्षण केले आहे”, असे विधान सोनम वांगचुक यांनी केले होते.
Sonam exposed the CJP squad ??
— Rupok Acharjee (@RupokAcharjee) August 30, 2026
He clearly said he won’t take responsibility or guarantee for any of them.
“They are no saints,” he said — while accusing them of pushing an AAP agenda.
Finally, the truth is coming out. ?️? pic.twitter.com/WcWdbaUM0Y
‘ते काही संत नाहीत’ – वांगचुक
मुलाखतीत बोलताना वांगचुक म्हणाले, “अभिजीत दिपके, आशुतोष आणि सौरव यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांनी भूतकाळात आम आदमी पार्टीसाठी काम केले आहे. अनेक लोक मला विचारतात की यांच्या काही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का? मला स्वतःला असे वाटते की, होय, त्यांच्या नक्कीच राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. ते काही संत नाहीत. मी त्यांचे खूप निरीक्षण केले आहे. पण यामध्ये काही चुकीचे किंवा वावगे आहे असे मला वाटत नाही.”
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका कथित विधानानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीच्या अकाऊंटची सुरुवात केली. पाहता पाहता सोशल मीडियावर याला जोरदार प्रसिद्धी मिळाली. ज्याची परिणीती पुढे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात झाली. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी २६ दिवस उपोषण केले.
SONAM WANGCHUK EXPOSES ABHIJIT DIPKE ?
— Sumit (@beingsumit01) August 29, 2026
– Sonam Wangchuk talks about Abhijit political ambitions.
– Also reveals his foreign connections and details. pic.twitter.com/qwQIOdrLxg
केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर सोनम वांगचुक यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आपले उपोषण मागे घेतले.
