Abhijit Dipke Statement on Sonam Wangchuk: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केले. ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि शैक्षणिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. जून महिन्याच्या अखेरीस सोनम वांगचुक जंतर-मंतरवर उपोषणासाठी बसले. २६ दिवसांनंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर घडलेला घटनाक्रम आणि कॉक्रोच जनता पार्टीने त्यांचा केलेला अनुल्लेख यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चा होत होत्या. त्यावर आता अभिजीत दिपके यांनी थेट भाष्य केले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांच्यामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या बेमुदत उपोषणामुळे सेलिब्रिटी, मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सरकारला आंदोलनाची दखल घ्यावी लागली. उपोषणाच्या १८ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने जंतर-मंतरहून उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्याचे दिसून आले.

सोनम वांगचुक हे सफदरजंग रुग्णालयातून मेदांता खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. या रुग्णालयाला छावणीचे स्वरूप दिले गेल्याचा आरोप सोनम वांगचुक यांनी केला होता. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. पत्नी आणि रक्ताच्या नात्यातील कुटुंबीय त्यांची भेट घेऊ शकत होते. उपोषणाच्या २६ व्या दिवशी सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि संजय सिंह यांच्या हस्ते उपोषण सोडले.

उपोषण सोडत असताना सोनम वांगचुक यांनी आपल्या मागण्या केंद्र सरकारला सांगितल्या होत्या. यात त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली नव्हती. सरकारने जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर त्यांचीच बदनामी होत राहिल, असा इशारा त्यांनी दिला होता. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीने जंतर-मंतरवरील आपले आंदोलन सुरूच ठेवले होते.

२५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घोषणेनंतर जंतर-मंतरवर जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र यावेळी सीजेपीकडून सोनम वांगचुक यांचे नाव घेतले गेले नाही, अशा बातम्या काही माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. पण अभिजीत दिपके यांनी त्यावेळी स्टेजवरूनच हे आंदोलन वांगचुक यांच्यामुळे मोठे झाल्याचे म्हटले होते.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

इंडिया टुडे न्यूज तकला दिलेल्या ताज्या मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी आता सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या मतभेदांवर थेट भाष्य केले आहे.

आंदोलनाचा समारोप करताना सोनम वांगचुक यांचे नाव घेतले गेले नाही, याबद्दलचा प्रश्न विचारला असता दिपके म्हणाले, वांगचुक यांचे बलिदान आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्ही आजही एकाच मताचे आहोत. मी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलतो.

२० जुलै रोजी पोलिसांनी ज्याप्रकारे लाठीचार्ज केला त्यानंतर ही चळवळ देशातील तरुणांची झाली होती. त्यामुळे राजीनाम्यानंतर मी त्यांचे आभार मानले होते. पण सोनम वांगचुक सरांचे योगदान आम्ही विसरू शकत नाही. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून देशाला जागे केले. सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी देशाला रस्त्यावर आणले. या उपोषणाशिवाय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा शक्यच झाला नसता, असेही अभिजीत दिपके म्हणाले.

वांगचुक यांचे अपहरण झाले होते

अभिजीत दिपके पुढे म्हणाले, “सोनम वांगचुक यांना बाराव्या दिवशी उपोषण सोडावे, अशी विनंती मी केली होती. आम्हाला त्यांच्या प्रकृतीविषयी खूप चिंता वाटत होती.” तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडल्याबाबत तुम्हाला काय वाटते? असे विचारले असता दिपके म्हणाले की, केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांची भेट घेण्यापासून सर्वांना रोखले होते. विरोधी पक्षातील खासदारांनाही त्यांना भेटू दिले जात नव्हते. फक्त जेपी नड्डा त्यांना भेटू शकत होते.

केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांचे अपहरण केले होते. त्यांना रुग्णालयात कोंडून ठेवले गेले. यामुळे नाईलाजाने त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले असावे. त्यांचे आयुष्य देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली.