अलिबाग : भारतातील लोकप्रिय पार्श्वगायक, संगीतकार, अभिनेते आणि पद्मश्री सन्मानित सोनू निगम यांनी बुधवारी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राला अचानक भेट देत शास्त्रशुद्ध शेतीविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या समवेत पत्नी मधुरीमा निगम, मुलगा निवान तसेच जिल्हा परिषद सदस्य व गटनेते बाबू घारे उपस्थित होते.

या भेटीदरम्यान कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या व शिफारस केलेल्या भाताच्या विविध सुधारित आणि संकरित वाणांची माहिती दिली. यासोबतच फळपिके, मसाला पिके, कृषी यंत्रसामग्री आणि सुधारित अवजारांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

विशेषतः भातशेतीतील मजुरीचा खर्च आणि कष्ट कमी करणारे सुधारित ड्रम सिडर तसेच मनुष्यचलित लावणी यंत्र यांविषयी माहिती घेताना सोनू निगम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष उत्सुकता दाखविली. या यंत्रांचा वापर, त्यांची कार्यपद्धती आणि किफायतशीर शेतीतील उपयोग याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा केली.

येत्या हंगामात कर्जत परिसरातील त्यांच्या फॉर्महाऊसवर कोंकण कृषी विद्यापीठाचे शिफारस केलेले भातवाण घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच पुन्हा केंद्राला भेट देण्याचेही आश्वासन दिले.

कोकण कृषी विद्यापीठामार्फत कर्जत येथे भात संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी भारतच्या विविध वाणावर नियमित संशोधन सुरू असते. भातांची विविध वाण या ठिकाणी विकसित करण्यात आली आहेत, या संशोधनाचा आढावा सोनू निगम यांनी घेतला.