लॉकडाउनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातील लेखातून सोनू सूदच्या कामगिरीला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. भाजपाने लॉकडाउनच्या काळात सोनू सूदचा वापरत तर केला नाही ना? असा सवाल करताना काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातूनही सोनू सूदच्या कार्याचा उल्लेख पहायला मिळेल असे मत त्यांनी मांडले होते.

राऊत यांच्या या लिखाणावरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. दिवसभर या प्रकरणी एकमेकांवर टिकाटिपण्णी सुरु होती. यापार्श्वभूमीवर सोनूने उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री गाठली.

दरम्यान, सोनूने संजय राऊतांकडून झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आपल्या ट्विटर हँडलवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तो म्हणतो की, “स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं.”

“महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका संजय राऊत यांनी या सदरातून केली आहे.