वाई : राज्यात लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत यावे अशी सर्व भाजप आमदारांची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहता काही झाले तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. यासाठीच्या हालचाली कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या आहेत असे भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना व काँग्रेसची मते फोडली. त्यातूनच त्यांच्या पाच जाग निवडून आल्या. आता शिवसेनेचे नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते सध्या राज्याबाहेर आहेत. एकुणच शिवसेनेतील नाराजी उफाळून आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून या संधीचे सोने करण्याची तयारी सुरू आहे असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सरकार अस्थिर असेल तरी काही तरी घडामोडी घडतील आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल. मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता नाही याबाबत आमच्या पक्षसंघटनेत तरी अशी काही चर्चा झालेली नाही, परंतु कोणत्याही परिस्थितीत पक्ष सांगेल त्याला सामोरे जायची आमची तयारी आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

    एकनाथ शिंदें बरोबर साताऱ्यातील महेश शिंदे व शंभूराज देसाई हे आहेत. याविषयी विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हे मला बातम्यांच्या माध्यमातून समजले आहे. मुळात हा दुसऱ्या पक्षांचा विषय आहे, त्यांच्या प्रमुख नेत्यांनी याची माहिती देणे गरजेचे आहे. पण काहीही झाले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल अशी अपेक्षा आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच देवेंद्र फडणीस होतील. आणि यावेळी आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा ही तेच करतील. सरकार अस्थिर झाला आहे की नाही हे मला माहीत नाही. मी त्याविषयी बोलणार नाही. पण या वेळी आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस विठ्ठलाची पूजा करतील असे सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.