नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प हा प्रशासनातील तज्ज्ञांमार्फत तयार केला जातो. यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा यासाठी नागरिकांकडून संकल्पना आणि सूचना मागवण्यात येत आहेत.महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून प्रथमच महापालिकेमध्ये हा अभिनव प्रयोग राबवण्यात येत आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे महापालिकेचा कारभार आहे. प्रशासक म्हणून आयुक्तांना अर्थसंकल्प जाहीर करायचा असल्यामुळे आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली असून यासाठी नागरिकांच्या सूचना आणि संकल्पनांची साथ घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
हेही वाचा >>>सीबीआयने ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना केली अटक
यासंदर्भात आयुक्तांनी सांगितले की, लवकरच महापालिकेचा अर्थसंकल्प नागरिकांसमोर येणार आहे. दरवर्षी प्रशासनातील तज्ज्ञांकडून आलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून अर्थसंकल्प जाहीर केला जात होता. आता मात्र नागरिकांना त्यांच्या क्षेत्रात कशाची आवश्यकता आहे, याची जाणीव या माध्यमातून प्रशासनाला होईल आणि त्या अनुषंगाने यावर निर्णय घेतला जाईल. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे यांनी सांगितले की, नागपुरातील नागरिकांकडून खालीलप्रमाणे सूचना किंवा संकल्पना मागवण्यात येत आहेत.
हेही वाचा >>>शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तरच्या निम्म्या जागांमध्ये घट! नियमित ऐवजी कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा परिणाम
नागरिकांना त्यांच्या प्रभागात भेडसावणारी समस्या वैयक्तिक नव्हे तर व्यापक स्वरूपाची असावी. शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून राबवण्यात येऊ शकणाऱ्या विविध उपाययोजना, सुचवाव्या.रस्ते, पाणी, स्वच्छता, परिवहन आदींसाठी सूचना देण्यात याव्या. नागपूरला राज्यातील क्रमांक एकचे शहर करण्यासाठी सूचना अपेक्षित आहेत. सर्व सूचना १० दिवसांच्या आत Email ID : financedepttnmc@gmail.com या ई-मेलवर पाठवण्यात याव्या, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.