प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर : दोन वर्षांपूर्वी सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल ११,००० रुपयांपर्यंत गेले होते. गतवर्षी ते आठ हजारांपर्यंत खाली उतरले व या वर्षी नवीन सोयाबीन बाजारात येईपर्यंत तो भाव आता पाच हजारांच्या खाली आला आहे. दिवाळीपासून नवीन सोयाबीन बाजारपेठेत येईल तेव्हा हा भाव साडेचार हजारांच्याही खाली जाण्याची भीती बाजारपेठेत व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी भलताच आर्थिक संकटात सापडला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच देश आपापल्या पद्धतीने बाजारपेठेवर स्वार होण्याचा प्रयत्न करत होते. खाद्यतेलाच्या बाबतीत आपण परावलंबी असल्याने अर्जेटिना, मलेशिया, युक्रेन या खाद्यतेल उत्पादक देशाने निर्यातीचा हात आखडता घेतला. आपला माल घेतल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन भाव वाढवले. प्रत्येक जण आपल्या देशातील देशांतर्गत उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी धडपडत होते, परिणामी शेतमालाचे भाव वाढले होते. बाजारपेठेतील ही भाववाढ ही एका अर्थाने करोनाच्या पार्श्वभूमीवरील कृत्रिम भाववाढ होती. खास करून सोयाबीन उत्पादक शेतकरी या बदललेल्या परिस्थितीमुळे आनंदी होते. लातूर जिल्हा हा सोयाबीनच्या क्षेत्रात संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. सोयाबीन लागवडीखालील महाराष्ट्राचे क्षेत्र हे दरवर्षी वाढते आहे. गतवर्षी ११ हजार रुपये असलेला सोयाबीनचा भाव आठ हजारांपर्यंत खाली उतरला व आता तो पाच हजारांच्या खाली उतरला आहे. सोयाबीन उत्पादनासाठी लागणारा सर्व प्रकारचा भांडवली खर्च, बियाणे, खते, शेतमजुरी, कीटकनाशकांची फवारणी, कापणी, काढणी हा खर्च वाढला आहे व सोयाबीनचा बाजारपेठेतील भाव मात्र कमी झाला आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.

२०२० मध्ये सोयाबीनचा भाव ३८५० ते ४२०० पर्यंत होता आता पुन्हा तीच स्थिती भावाची येऊ घातल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजारपेठेतील सोयाबीनचे भाव वाढल्यानंतर केंद्र शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क शून्यावर आणली. हे आयात शुल्क ४१ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलेले होते .मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने ही कृती केली होती. त्याचा बाजारपेठेवर चांगला परिणाम झाला होता. अटलजीच्या काळात ७० टक्केपर्यंत आयात शुल्क वाढवले होते. बाजारपेठेतील भाव वाढले या कारणाने गेल्या वर्षभरात आयात शुल्क घटवले, त्यामुळे बाजारपेठेत भाव पडले आहेत.

संपूर्ण जगभरातच आर्थिक मंदीची लाट आहे .पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने विदेशी चलन घटले आहे. त्यामुळे आहे तो शेतमाल तातडीने बाजारपेठेत विकण्याचे आदेश संबंधित सरकारने दिले आहेत, त्यामुळे बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर मालक पाठवण्यात आला आहे त्यातून मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे भाव पडलेले आहेत. आपल्या देशाने खाद्यतेलाच्या आयातीसाठी आगामी दोन वर्षांचे करार करून ठेवले आहेत व तशा परवानग्या संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

वीस लाख टनांपेक्षा अधिकचे खाद्यतेल आयात करायला व त्यासाठी शून्य टक्के आयात शुल्क आकारले जाणार असल्याचे कळवल्यामुळे बाजारपेठेत आगामी काळात भाववाढ होण्याची शक्यता दिसत नाही. दसरा, दिवाळीच्या तोंडावर साधारणपणे सर्वच वस्तूंचे भाव वाढतात. मात्र या वर्षी खाद्यतेलाच्या भावात किलोमागे ५० ते ६५ रुपयांची घट झाल्याचे दिसते आहे. सहा महिन्यांपूर्वी सूर्यफुलाचा प्रति किलो भाव हा १८५ रुपये होतात. सध्या तो १२० रुपये आहे. १६५ रुपये किलोने विकले जाणारे सोयाबीन तेल सध्या ११५ ने आणि १५० रुपयाने विकले जाणारे पामतेल ९६ रुपये किलोने बाजारपेठेत विकले जाते आहे. दररोज भाव बदलत असल्याने खाद्यतेलाचे व्यापारी मोठय़ा अडचणीत आले आहेत. छोटे दुकानदार रोज जेवढी आपली विक्री होईल तेवढाच माल खरेदी करतात, कारण पुन्हा भावात बदल झाला तर त्याला तो फटका परवडत नाही. विदेशातून खाद्यतेलाची आयात करताना किमान २५० टन खाद्यतेल आयात करावे लागते. तेलाच्या भावातील फरकाचा फटका आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना २५० टनांमागे दीड कोटी रुपयांचा बसला आहे. त्यामुळे व्यापारी अगदी जितका माल विकला जाईल तेवढाच आयात करण्यावर भर देत आहेत. बाजारपेठेत भाववाढ होण्याची शक्यता नसल्यामुळे व्यापारी अडचणीत, शिवाय सोयाबीन व सर्व प्रकारच्या खाद्यतेल उत्पादनांना साठवणुकीच्या मर्यादा सरकारने घातलेल्या आहेत. साठवणुकीच्या मर्यादा असल्यामुळे व्यापारी माल खरेदी करण्यास धजावत नाहीत. परिणामी त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेचे काय झाले?

शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि शेतमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार भाव दिला जाईल असे अभिवचन दिले होते. आपणच दिलेल्या अभिवचनाला ते हरताळ फासत असल्याचे चित्र बाजारपेठेमध्ये दिसते आहे. ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ असे म्हटले जाते. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाला तोटाच आहे. त्यांच्या वाटय़ाला आनंद मिळण्याचे दिवस दसरा, दिवाळीच्या सणांमध्येही येत नसल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soybean farmers financial crisis due to fall prices farmers festival days ysh
First published on: 07-10-2022 at 00:02 IST