Abu Azmi On Sanjay Shirsat Statement Khuldabad Rename : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, यातच खुलताबादचं नामांतर होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याविषयी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबाद शहराचं नामांतर रत्नपूर असं केलं जाईल, असं म्हटलं होतं.

खुलताबाद शहराचं नामांतर करण्याच्या संदर्भात संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर शहरांचं नामांतर करून देशातील कायदा-सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी कमी होणार असेल तर एका शहराचं नाही तर संपूर्ण देशाचं नाव बदला, आम्ही स्वागत करू, असं म्हणत आमदार अबू आझमी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आमदार अबू आझमी काय म्हणाले?

“जुन्या शहरांची नाव बदलून काय होणार? सरकारने एखादं नवीन शहर वसवलं तर मग होईल. माझं म्हणणं आहे जर शहरांची नाव बदलून महागाई संपणार असेल, बेरोजगारी संपणार असेल, देशातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारणार असेल तर एका जागेचं नाही तर संपूर्ण देशाचं नाव बदला आणि स्वागत करू”, असं आमदार अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

“सध्या नावं बदलण्यामागचा हेतू हाच आहे की देशातील इतर मूळ मुद्द्यांपासून, प्रश्नांपासून लोकांनी भरकटलं जावं, एकीकडे महागाई वाढली आहे, दुसरीकडे चीनकडून भाराताच्या भूमीवर कब्जा करण्यात येत आहे, तसेच सरकारडे लाडक्या बहि‍णींना पैसे देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, अशा गोष्टींपासून लोकांना भरकटवण्यासाठी नावं बदलण्याचा मुद्दा पुढे केला जात आहे. पण हे सर्व चुकीचं आहे. देशात विकासाची कामं झाली पाहिजेत. खरा इतिहास दाखवला गेला पाहिजे”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

“छत्रपती संभाजीनगरचं पूर्वी खडकी असं नाव होतं. कालांतराने त्याचं नाव औरंगाबाद असं झालं. त्याचप्रमाणे खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूर होतं. कालांतराने ते खुलताबाद झालं. औरंगजेबाने जे जे कारनामे केले त्यात शहरांची नावं बदलण्याचा प्रकारही त्याने केला. त्याने अनेक शहरांची नावं बदलली. धाराशिव, नगरचाही त्यात समावेश होता. आपल्या राज्यात ज्या ज्या शहरांच्या, ठिकाणांच्या नावात बाद-बाद (उदा : दौलताबाद) असा उल्लेख आहे ती सर्व नावं बदलली जातील. आम्ही (महायुती सरकार) नावं बदलण्याची प्रक्रिया हाती घेत आहोत. त्यानुसार खुलताबादचं रत्नपूर असं नाव असलं पाहिजे. कारण तेच नाव पूर्वी देखील होतं. औरंगाबादचं नाव बदललंय. तसंच आता खुलताबादचं बदललं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.