scorecardresearch

सांगलीमध्ये चिमण्यांच्या संख्येत ७६ टक्क्यांनी घट ; चिमण्यांच्या गणनेतील धक्कादायक निष्कर्ष;

दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये केलेल्या गणनेमध्ये १२ हजार ४५ चिमण्या आढळल्याची नोंद करण्यात आली होती

१३ शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून गणना

दिगंबर शिंदे लोकसत्ता

सांगली : दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत सांगलीमध्ये चिमण्यांची संख्या तब्बल ७६ टक्क्यांनी घटली असल्याने चिऊप्रेमी धास्तावले आहेत. चिमणी दिनाच्या निमित्ताने १३ शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून चिमणी गणना करण्यात आली.

करोनामुळे दोन वर्षे चिऊंची मोजदादच करता आली नव्हती. दोन दिवसांपूर्वी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी बर्ड साँग आणि वन विभागाच्या मदतीने चिमण्यांची गणना करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये १३ शाळांमधील ५५ विद्यार्थ्यांसह १५० स्वयंसेवकांचा यामध्ये समावेश होता. महापालिका क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या मोजणीमध्ये स्वयंसेवकांनी २ हजार ८२५ चिमण्यांची नोंद केली आहे, तर जिल्हाभरात १४८ जणांनी केलेल्या मोजणीमध्ये २ हजार ७८ चिमण्या आढळल्याची नोंद झाली आहे. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये केलेल्या गणनेमध्ये १२ हजार ४५ चिमण्या आढळल्याची नोंद करण्यात आली होती. या वेळी मात्र ही संख्या तब्बल ७६ टक्क्यांनी घटून २ हजार ८२५ इतकी झाली आहे. चिमणींची नोंद कमी होण्यामागे विविध कारणे व गणनेतील त्रुटी कारणीभूत असल्याचे बर्ड साँगचे शरद आपटे यांनी सांगितले. यामध्ये मोजणी करणाऱ्यांची संख्या, काटेकोर नोंदणीतील गांभीर्य बदलले असावे, एकाच ठिकाणी नोंदणी करायला हवी होती, मात्र, या वेळी जागा बदलल्याचा परिणाम असू शकतो. तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण यापूर्वी शाळेत जाऊन देण्यात आले होते. या वेळी नोंदणी आभासी पद्धतीने झाल्याने मोजणीत कमी चिमणीसंख्या आढळली असावी, अशी शंका असल्याचे आपटे यांनी सांगितले.

चिऊच्या घरटय़ावर मुलांची चित्रे

चिमणी दिनानिमित्त सांगलीत मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. खोपा बर्ड हाउस, आभाळमाया, बर्ड साँग आणि महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत तब्बल बाराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही चित्रकला स्पर्धा कागदावर न घेता चिऊच्या घरटय़ावर घेण्यात आली. चिऊचे घरटे तयार करून मुलांनी चित्रे रेखाटली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sparrows population decreased by 76 percent in sangli zws

ताज्या बातम्या