Yogesh Kadam : मराठी येत नसल्याने एका हॉटेल मालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी में बोल असं हिंदीत धमकावत मारहाण केली होती. या प्रकरणावर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी मारहाण केली त्यांना आम्ही समज दिली आहे, तुम्ही तक्रार करा, कायदा हातात घेऊ नका असं त्यांना सांगितल्याचंही योगेश कदम म्हणाले आहेत.
नेमकी घटना काय घडली?
मुंबईतल्या मीरा रोड या ठिकाणी रेस्तराँचा मालक मराठीत बोलला नाही म्हणून त्याला मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत हे दिसतं आहे की मला हे माहीत नाही की मराठी सक्तीची आहे. मला कुणीतरी मराठी भाषा शिकवा मी मराठीत बोलेन असं त्याने शांतपणे या तीन कार्यकर्त्यांना सांगितलं. यावरुनच वाद सुरु झाला. हा महाराष्ट्र आहे, मग तुला मराठीतच बोलावं लागेल असं मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी सांगितलं. तू कुठल्या राज्यात व्यवसाय करतो आहेस? त्यावर तो रेस्तराँ मालक म्हणाला की महाराष्ट्रात. मग तुला मराठीच बोलावं लागेल असं म्हणत त्याला मारायला सुरुवात केली. विशेष बाब म्हणजे हे मनसेचे हे सगळे कार्यकर्ते त्या रेस्तराँ मालकाला हिंदीत हे बजावत होते की मराठी में बोल. सचिन गुप्ता नावाच्या स्थानिक पत्रकाराने हा व्हिडीओ पोस्ट केला. जो चांगलाच व्हायरल झाला. आता त्याबाबत योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
योगेश कदम काय म्हणाले?
महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावीच लागेल. मराठी येत नाही वगैरे हे ऐकून घेतलं जाणार नाही. किमान आम्ही मराठी बोलायचा प्रयत्न करु हे सांगा. मला वाटतं की कुठल्याही इतर भाषेचा अपमान आम्हाला करायचा नाही. मात्र मराठीचा अपमान कुणी केला तर आम्ही ऐकून घेणार नाही. हॉटेल मालकाला मराठी येत नाही म्हणून ज्यांनी मारहाण केली त्यांना आम्ही समज देऊ की कायदा हातात घेऊ नका. तुम्ही तक्रार करा अशा पद्धतीने प्रकार झाले तर आम्ही त्याची दखल घेऊ. असं गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा
मनसेचे कार्यकर्ते पुढे त्या रेस्तराँ मालकाला विचारतात तू महाराष्ट्रात कुठली भाषा बोलली पाहिजे? त्यावर तो मालक सांगतो महाराष्ट्रात सगळ्यात भाषा बोलल्या जातात. रेस्तराँ मालकाने हे उत्तर दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला कानशिलात लगावली. तसंच इतरही कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी या मालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.