गणेश रघुवीर

महाराष्ट्रातील गडकोट हे इतिहासाचे साक्षीदार आहेत.. ते दारू पिऊन मज्जा मस्ती करणे,अश्लीश चाळे करणे ,तलाव व पाण्याच्या टाक्यात पोहणे,तोफांवर बसण्यासाठी नाहीत… आजच्या घडीला जरी गडकिल्ले संरक्षित किंवा असंरक्षित स्मारक असले तरी त्याचे पावित्र्य बिघडविण्याचे काम काही हौशी पर्यटकांकडून होत आहे. पर्यटक खुशाल गड किल्ल्यांवर दारु पिऊन धिंगाणा घालतात. प्रेमी युगुल असेल तर अश्लील चाळेही करतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शिवरायांचे गड किल्ले का हवेत? हा शिवरायांच्या गड किल्ल्यांचा अपमान नाही का? हे प्रश्न पडल्यामुळेच सह्याद्री प्रतिष्ठान आणि बजरंग दलाने ठोक मोहिम हाती घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा अपमान करणाऱ्यांना चोप देण्याचा चंगच आम्ही बांधला आहे. ज्यामुळे अशा गोष्टींना लगाम घालता येईल.  संरक्षित स्मारकावर राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाने जिथे रुपये २५/- एवढा तिकीट दर आकारला जातो तेथे त्यांनी गडकिल्यांच्या वास्तूंची होणारी हानी व विटंबना याकडे लक्ष दिले पाहिजे असेही वाटते. मात्र तसे होत नसल्यानेच आम्ही ठोक मोहीम हाती घेतली आहे.

लोहगडावर पुरातत्व विभागाने सुरक्षा रक्षक वाढवावे आणि गडावर चारही बाजूंना फिरत रहावे अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. अनेकदा उत्साही पर्यटक किल्ल्यात अवघड ठिकाणी जातात आणि अपघात होतात किंवा त्या ठिकाणी हे पर्यटक गिर्यारोहक अडकून पडतात. गेल्याच आठवड्यात एक डॉक्टर विसापूर किल्ल्याच्या बुरुजावर तीन तास अडकला होता. या सगळ्या घटना टाळायच्या असतील तर गस्त घालणे हा उपाय आहे. जेणेकरुन दुर्घटना घडणे टाळता येईल. सध्या गड किल्ल्यांवर हे प्रकार वाढत आहेत त्यामुळे ही मागणी आम्ही केली आहे.

२१जुलै२०१९ रोजी लोहगडावरील त्रंबक तलाव व पाण्याच्या टाक्यात पर्यटक पोहत व लघुशंका करत होते. याला विकृतीचा कळसच म्हणता येईल. कारण याच तलावतातले पाणी शेजारी असलेल्या महादेव मंदिरातील शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो.  देवाची अशी विटंबना टाळण्यासाठी तरुणांची ही विकृती रोखायलाच वही. अनेकदा गडावरचे तलाव आणि पाण्याचे टाके यातले पाणी पिण्यासाठीही वापरले जाते.  गोष्टी तसेच गडावरील तलाव व पाण्याचे टाके यातील पाणी हिवाळा व उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरले जाते. ही गोष्ट पर्यटक का लक्षात घेत नाहीत?

गेल्या महिन्यात कोथळीगडावर काही पर्यटक दारूची पार्टी करत होते. राजगडावर एका प्रेमी युगलाकडून अश्लील चाळे करण्याचा फोटो सोशल मीडियावर आला. तर विसापूर किल्ल्यावर पर्यटक अवघड ठिकाणी अडकले होते. पावसाळ्यात मज्जा मस्ती आणि पार्ट्या करण्यासाठी अनेक हौशी पर्यटक हे गडकिल्यांवर जातात. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून जर यावर पुरातत्व विभागाने लक्ष घातले नाही.केंद्र पुरातत्व विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचाच मार्ग सह्याद्री प्रतिष्ठानकडे उरतो. पर्यटकांनी गिर्यारोहणाचा आनंद जरुर लुटावा पण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे हे गड किल्ले अश्लील चाळे करण्याचे आणि दारु पिऊन धिंगाणा घालण्याचे ठिकाण नाही हेदेखील ध्यानात ठेवावे.

लेखक-गणेश रघुवीर, अध्यक्ष दुर्ग संवर्धन विभाग
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र