scorecardresearch

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ

वाघ पकडण्यासाठीची प्रचलित पद्धत म्हणजे वाघाला विशिष्ट बाणाद्वारे (डार्ट) इंजेक्शन मारून बेशुद्ध करणे.

वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ

चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्षांमुळे अनेकदा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते, परंतु घनदाट जंगलात चिखलाने माखलेल्या रस्त्यांनी घटनास्थळी पोहोचणे आणि वाघांना इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करणे आव्हानात्मक असते. हे काम सोपे व्हावे यासाठी एक विशेष सुरक्षारक्षक वाहन तयार करण्यात आले असून ते शुक्रवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले.

वाघ पकडण्यासाठीची प्रचलित पद्धत म्हणजे वाघाला विशिष्ट बाणाद्वारे (डार्ट) इंजेक्शन मारून बेशुद्ध करणे. मात्र वाघ आक्रमक झाला किंवा तो जर अडचणींच्या जागेवर असेल तर त्याला ‘डार्ट’ मारता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन हे विशेष सुरक्षारक्षक वाहन तयार करण्यात आले आहे. हे विशेष वाहन जंगलातल्या दुर्गम भागात, कुठल्याही ऋतूत काम करू

शकेल.

‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाचे अध्यक्ष- संचालक विवेक गोएंका आणि झिटा गोएंका यांनी १५ लाख रुपये किमतीचे हे वाहन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिले आहे. नागपुरातील श्री ऑटो रिस्टोअररचे संचालक श्रीश देवधर यांनी हे वाहन तयार केले आहे. ताडोबा प्रकल्पात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे वन्यजीवप्रेमी तथा तरुण भारत वृत्तपत्राचे संचालक धनंजय बापट यांनी वाहनाची चावी सुपूर्द केली. या वेळी ताडोबा प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे उपस्थित होते.

वाहनाची वैशिष्टय़े

’ या वाहनात ३६०० सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे.

’ अन्य सामान्य वाहनांपेक्षा हे वाहन उंच आहे.

’ चिखल, पाणथळ जागा अशा अडचणीच्या मार्गातून हे वाहन सहज मार्ग काढू शकते.

’ वाहनात फ्रीज असल्यामुले बेशुद्धीरकरणाचे इंजेक्शन ठेवता येते.

’ या वाहनामुळे जखमी वाघ, बिबटय़ा आणि इतर वन्यप्राण्यांना जेरबंद करणे अधिक सोपे झाले आहे.

वाघ आणि त्यांचे संवर्धन हा माझ्यासाठी जिव्हाळय़ाचा विषय आहे. वाघांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आवश्यक असलेले वाहन उपलब्ध नव्हते, हे कळल्यानंतर या विशेष वाहनाच्या आरेखनाचा निर्णय घेतला. या वाहनामुळे वाघांचा जीव वाचवण्यास मदत होईल. माझ्यासाठी ही अत्यंत आनंददायी बाब आहे.    – विवेक गोएंका, अध्यक्ष, इंडियन एक्स्प्रेस समूह

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Special security guard vehicle at the tadoba tadoba andhari national park akp

ताज्या बातम्या