सोलापूरच्या वस्त्रोद्योग नगरीत एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. परंतु कापड गिरण्या बंद पडल्या आणि हजारो कामगार देशोधडीला लागले. सोलापूरचा विकास खुंटला आणि या शहराची ‘गिरणगाव’ म्हणून संभावना होऊ लागली. परंतु सोलापुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्याचे व त्याचा लाभ सोलापूरलाही मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला. तर पंढरपूर-आळंदी व पंढरपूर-देहू तसेच सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर-गुलबर्गा या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा याच सभेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्यामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळण्याविषयीचा विश्वास बळावला.दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथे पॉवरग्रीड कॉर्पोरेशनने उभारलेल्या सोलापूर-रायचूर पारेषण वाहिनी प्रकल्पासह सोलापूर-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते झाला. यानिमित्ताने होम मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाला सोलापूरकरांनी तितकाच प्रतिसाद दिला. तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मोदी यांची जाहीर सभा याच होम मैदानावर झाली होती. त्यावेळचा सोलापूरच्या नागरिकांचा उत्साह तसूभरही कमी न होता आताही कायम राहिल्याचे नमूद करीत, पंतप्रधान मोदी यांनी, सोलापूरकरांच्या या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रेमाची विकासाच्या माध्यमातून व्याजासकट परतफेड करण्याची ग्वाही दिली. वस्त्रोद्योग विकासाला चालना देण्याचे धोरण स्पष्ट करताना त्यात सोलापूरच्या विकासाचा मुद्दा त्यांनी आवर्जून विशद केला. त्यामुळे मोदी यांच्या भाषणावर सोलापूरकर भलतेच फिदा झाले. वास्तविक पाहता पंतप्रधान मोदी यांनी लोकार्पण केलेल्या पॉवरग्रीड प्रकल्पासह सोलापूर-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काँग्रेसचे नेते तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गी लावले आहे. मोदी यांच्या भाषणाच्यावेळी सोलापूरकरांना शिंदे यांच्या या कामाचा कदाचित विसर पडला असावा. या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते बांधणीला चालना देण्याचे धोरण मांडताना येत्या दोन वर्षांत पंढरपूर-आळंदी व पंढरपूर-देहू या पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली. या कामासाठी माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अलीकडेच गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. त्याचा पाठपुरावाही चालविला होता. त्याप्रमाणे अल्पावधीतच गडकरी यांनी सोलापूरच्या सभेचे निमित्त साधून पंतप्रधानांच्या साक्षीने पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केल्यामुळे समस्त वारकऱ्यांना दिलासा मिळाला. याशिवाय सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर-गुलबर्गा या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून त्याचेही चौपदरीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे सोलापूरकरांसह समस्त स्वामी समर्थ तथा गाणगापूरच्या दत्त भक्तांना दिलासा मिळाला. सोलापूरच्या विकासासाठी मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केंद्राकडे पाठपुरावा चालविला असून ही मागणी मान्यही करण्यात आली आहे. केवळ हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या सरव्यवस्थापकांकडून अधिकृत परवानगी मिळण्याचा उपचार शिल्लक राहिला आहे. त्याची पूर्तता करण्याची घोषणा पंतप्रधानांच्या सभेत झाली असती, तर सोलापूरकरांच्या दृष्टीने ही बाब ‘सोने पे सुहागा’ अशीच ठरली असती, अशी भावना नागरिकांसह व्यापारी व उद्योजकांनी व्यक्त केली.पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी प्रचंड प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी दोनपासूनच विमानतळापासून ते होम मैदानापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. रस्त्यावरील सर्व दुकाने, बाजारपेठा, लगतच्या शाळा, महाविद्यालयांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले होते. संपूर्ण निर्मनुष्य रस्त्यावर केवळ पोलिसांचाच वावर होता. पोलिसांची वाहने धावत होती. त्यामुळे त्याठिकाणी अघोषित संचारबंदीचे चित्र पाहावयास मिळाले. पायाभूत सुविधांना प्राधान्यक्रम - मोदीदेशात रस्ते, पाणी, वीज यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपल्या सरकारचा प्राधान्यक्रम राहणार असून त्यातून देशाचा भरीव विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत विकास करताना प्रत्येक क्षेत्र एकमेकास जोडावे लागेल, असा निर्धार बोलून दाखविला.सोलापूरजवळ लिंबी चिंचोळी येथे पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने उभारलेल्या ७६५ केव्ही सोलापूर-रायचूर पारेषण वाहिनीचा, तसेच सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला; त्या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेस एक लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन् व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार अॅड. शरद बनसोडे आदी उपस्थित होते.जल्लोषमय व उत्साही वातावरणात झालेल्या सभेत मोदी यांनी यापूर्वीच्या केंद्र सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले, तसेच गुजरातच्या प्रगतीचे गुणगान गायले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही चिमटे काढले. आपल्या २८ मिनिटांच्या भाषणात पायाभूत विकासासह रोजगार निर्मितीवर व त्यातून समर्थ भारत घडविण्यावर भर दिला. ते म्हणाले, देशात आतापर्यंत अनेक निवडणुका वीज, सडक व पाणी (बीएसपी) या पायाभूत विकासाच्या मुद्यांवर लढल्या गेल्या. आपण याच पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास महत्त्व दिले तर जनतेतील पुरूषार्थ जागा होईल. शेतक ऱ्यांना पाणी मिळाले तर ते सोने निर्माण करू शकतात. कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्यक्रम देतानाच उद्योग विकासाला चालना देऊन काम केल्यास जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात डॉक्टर, शिक्षक, सरकारी कर्मचारी राहण्यास तयार नसतात, कारण तेथे वीज नसते. आता आपल्या सरकारने वर्षांतील ३६५ दिवस व २४ तास ग्रामीण भागात वीज उपलब्ध व्हावी म्हणून वीज उत्पादन वाढीवर भर दिला आहे. एकीकडे वीज निर्मिती करून त्याचा पुरवठा करताना दुसरीकडे वीज बचतही करावी लागेल. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशात वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास घडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात वीजनिर्मितीसाठी कोळसा व गॅसची कमतरता असल्याची अडचण नमूद करून ती सोडविण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. तसेच रस्ते बांधण्यासाठी पुरेसा निधी द्यावा आणि पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग कोकणाला जोडण्यासाठी सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी बोगदा तयार करावा, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. गडकरी यांनी देशातील तीर्थक्षेत्रांना रस्ते जोडण्याच्या कार्यक्रमांतर्गत राज्यात आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गाचे चौपदरीकरण येत्या दोन वर्षांत करण्याची घोषणा केली. ‘वीजटंचाईस तत्कालीन केंद्र सरकार जबाबदार’मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या वीज कमतरतेबाबत त्यांना चिमटा काढत मोदी म्हणाले, हीच व्यथा आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्राकडे मांडत होतो. सरदार सरोवर वीज प्रकल्प सुरू होण्यासाठी आपण पाठपुरावा करीत होतो. या वीज प्रकल्पातून महाराष्ट्राला दरवर्षी ४०० कोटींची वीज मोफत मिळणार होती. परंतु त्याकडे तत्कालीन सरकारने डोळेझाक केली, असा टोला मोदी यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळसोलापूरच्या शासकीय कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भाषण करायला उठले तेव्हा उपस्थित जनसमुदायाने त्यांना विरोध करीत, ‘मोदी-मोदी’ असा धोशा लावला व त्यांच्या भाषणात सातत्याने व्यत्यय आणला. हा गोंधळ थांबावा म्हणून खुद्द पंतप्रधान मोदी यांनी हात उंचावून जनसमुदायाला शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु गोंधळ सुरूच राहिला. या गोंधळातच मुख्यमंत्र्यांना भाषण करावे लागले.