काँग्रेसमधील सततच्या संघर्षांमुळे बहुचर्चित राहिलेल्या कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊन स्वपक्षीयांना जोराचा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांची नवी भूमिका, नवी राजकीय गणिते मांडणारी राहणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे सध्या कराड दक्षिणचे नेतृत्व करीत असून, उंडाळकर व चव्हाण गटामध्ये सध्या टोकाचा संघर्ष आहे. अशातच या मतदारसंघात कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद असल्याने काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागेल. परिणामी मतदारांचीच कसोटी लागणार आहे. तर, उंडाळकरांची व बाळासाहेबांची नेमकी भूमिका काय राहिल याबाबत आत्तापासूनच चर्चा रंगू लागली आहे.
रविवारी टंचाई आढावा बैठकीचे निमित्त करून, कराडच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीबरोबरच राजकीय आखाडाही चांगलाच गाजवला. सातारा जिल्ह्याच्या पाणी टंचाईसाठी मुख्यमंत्री निधीतून ८ कोटी रूपये देण्याचे जाहीर करताना, लोकआग्रहास्तव कराड दक्षिणमधून लढण्यास अनुकूलता दर्शवून दुष्काळाबरोबरच विधानसभा निवडणुकीचाही सामना करण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसाठी अपेक्षित असली तरी राजकीय वर्तुळात खळबळ माजून आहे.
एकीकडे दिवंगत काँग्रेसनेते विलासराव देशमुख यांचे जावई डॉ. अतुल भोसले हे प्रचाराचे रान उठवून आपली उमेदवारी प्रभावी ठरवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. तर, उंडाळकरांनी नेहमीप्रमाणे गावोगावी प्रचाराच्या फेऱ्यावर फेऱ्या कायम ठेवल्या आहेत.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या गटाने विकासकामे आणि गटबांधणीवर जोर देऊन  आपली वैयक्तिक तयारी ताकदीची केली आहे. काँग्रेससोबत आघाडी न झाल्यास शरद पवारांनीही बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार देण्याची तयारी ठेवली असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून केला जात आहे. मात्र, काँग्रेससोबत आघाडीचे गणित पक्के होत चालल्याने तसे झाल्यास पवार पॉवरची भूमिका काय राहील याबाबत सध्यातरी अंदाज बांधणे अवघड आहे. मुख्यमंत्र्यांच्या गटातून पृथ्वीराजबाबांच्या  उमेदवारीची खात्री दिली जात आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांचा गट सतर्क झाला असून,  राजकीय पटलावर गतीने घडामोडी अपेक्षित मानल्या जात आहेत.