सातारा: सातारा-लोणंद या सतत मोठ्या गर्दीच्या राज्यमार्गावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला. लोणंदच्या दिशेने साताऱ्याकडे जाणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव ट्रकने थेट देऊर येथील एसटी बसस्थानकातील उपाहारगृहाला (हॉटेल) जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत उपाहारगृहाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने हॉटेलमधील तरुण या अपघातात बालंबाल वाचल्याने मोठा अनर्थ आणि जीवितहानी टळली आहे.
पहाटेची वेळ ठरली देवदूत!
देऊर हे महत्त्वाचे केंद्र असून परिसरात प्रसिद्ध देवस्थान, शाळा आणि महाविद्यालये असल्याने या बसस्थानकावर दिवसभर प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. सुदैवाने अपघात पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जर हा अपघात दिवसा घडला असता, तर अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला असता, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थ आक्रमक; आंदोलन पेटणार?
या मार्गावर सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या:
देऊर बसस्थानक परिसरात तत्काळ गतीरोधक (स्पीड ब्रेकर) उभारणे.
देऊर ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’चा इशारा; गतीरोधक आणि सिग्नल यंत्रणा बसवण्याची आक्रमक मागणी केली आहे
स्पीड कॅमेरे आणि सिग्नल यंत्रणा त्वरित बसवणे.
प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देऊर ग्रामस्थांनी दिला आहे. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.
