Rising Mumbai Fire Incidents due to Summer: वाढत्या तापमानामुळे मुंबईत अंगाची काहिली होत असून, मुंबईकर घामाघूम झाले आहेत. कडक उन्हामुळे दुपारी घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर पडणे धोक्याचे ठरत आहे. कडक उन्हामुळे मुंबईकर घरात किंवा कार्यालयातच थांबत आहेत. उकाडा कमी व्हावा यासाठी पंखे, एसी, फ्रिज, एअर कुलर आणि इतर उपकरणांचा वापर वाढला असून विद्युत यंत्रणांवर ताण येऊन ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. निवासी इमारती, भंगार गोदामांपासून ते बस डेपो आणि विमानतळांपर्यंत अनेक ठिकाणी महिन्याभरात १६ मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. वाढलेल्या तापमानाबरोबरच आता वाढत्या आगीच्या घटना महानगरपालिका आणि अग्निशमन यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आहे.
ओव्हरलोडिंग टाळण्याचे आवाहन
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करुन त्यांच्या जोडणीबाबत खात्री करावी. तसेच एका प्लग पॉइंटमध्ये अनेक उपकरणे जोडून ओव्हरलोडिंगसारखे प्रकार टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कुठे घडल्या आगीच्या घटना?
७ एप्रिल रोजी आरे येथील रॉयल पाम्स इस्टेटमध्ये लेव्हल वन स्तराची आग लागल्याची मोठी घटना घडली. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमधून २२ रहिवाशांना बाहेर काढून बचाव कार्य राबविले. दुसऱ्याच दिवशी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ येथे छोटी आग लागली. ज्यामळे विमान वाहतुकीचा खोळंबा झाला.
पुढच्या काही दिवसांत क्रॉफर्ड मार्केट, बस डेपो, भंगाराची गोदामे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये आगीच्या घटना घडल्या. सर्वात अलीकडील घटना ६ मे रोजी टी२ एअरपोर्ट मेट्रो स्थानकाच्या तांत्रिक रुममध्ये आगीची घटना घडली.
१० एप्रिल रोजी कामाठीपुरा येथील ९ व्या गल्लीत लागलेल्या आगीत ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर दोन घटनांमध्ये दोन व्यक्ती भाजल्यामुळे जखमी झाले. मानखुर्दच्या मंडाला भंगार बाजारात आग लागल्यामुळे शाहरुख खान (२५) हा व्यक्ती ४०-४५ टक्के भाजल्यामुळे जखमी झाला. तर वडाळ्यातील संगम नगर येथील एका हेअर सलूनमध्ये लागलेल्या आगीत मोहम्मद उमर (६५) जखमी झाला.
उष्णतेमुळे आगीचा धोका वाढू शकतो?
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उन्हाळ्यामुळे निवासी इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये कुलिंग उपकरणांचा वापर वाढला आहे. ज्याचा अंतर्गत विद्युत प्रणालीवर ताण वाढला आहे.
मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी डॉ. दीपक घोष यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले, “उन्हाळ्यात विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते. वातानुकूलित यंत्र (एसी), एअर कुलर आणि इतर उपकरणांचा वापर या काळात वाढला आहे. इलेक्ट्रिकल केबल्समधून अधिक करंट वाहत असल्यामुळे जास्त उष्णता निर्माण होते. ज्यामुळे वायर वितळून शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका निर्माण होतो.”
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, जुने वातानुकूलित यंत्र किंवा योग्य देखभाली अभावी आगीचे धोका वाढतात.
डॉ. घोष पुढे म्हणाले, “कमी क्षमतेची विद्युत प्रणाली असतानाही उन्हाळ्यात निवासी भागात मोठ्या प्रमाणात एसी आणि एअर कुलरचा वापर केला जातो. वायरिंग आणि सर्विसिंग वेळेवर केलेली नसेल तर अशावेळी विद्युत प्रणालीवर ताण निर्माण होतो आणि आग लागण्याच्या घटना घडतात.” मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, ज्याठिकाणी दाटीवाटीने सामान कोंबलेले असते किंवा कचरा जाळला जातो, गॅस गळती असते अशा ठिकाणी उष्ण आणि कोरड्या वातावरणात आग लागल्याच्या घटना घडतात.
निवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये नियमित अग्नी सुरक्षा तपासणी न केल्यामुळे आगीचा धोका वाढतो. अशावेळी वेळोवेळी तपासणी केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.
मुंबई महानगरपालिकेने कोणता सल्ला दिला?
बुधवारी अग्निशमन दलाकडून नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करावी. तसेच वाळलेली पाने, कचरा आणि इतर ज्वलनशील पदार्थ जाळण्याचे टाळावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
याशिवाय अधिकृत तज्ज्ञांकडून एलपीजी सिलिंडर आणि गॅस पाइपलाइनची तपासणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी इमारती आणि व्यावसायिक संकुलांना सूचना देताना म्हटले की, एखादी आग लागल्याची घटना घडल्यास नागरिकांना सुखरुपपणे बाहेर पडता येईल आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेश मिळेल, यासाठी आत-बाहेर पडण्याचा मार्ग अडथळ्यांपासून मुक्त ठेवला जावा.
आगीची दुर्दैवी घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मुक्त व सुरळीत हालचालीसाठी आवश्यक तेवढी पुरेशी जागा मोकळी ठेवावी, असेही अंबुलगेकर यांनी सांगितले.
