आस्थापने, बाजारपेठा बंद; उद्योग मात्र सुरू
पालघर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविल्याने जिल्ह्याच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्योग वगळता आस्थापने, बाजारपेठा बंद होत्या. अनेक ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको करण्यात आले.
पालघर, बोईसर, मनोर, सफाळे या प्रमुख शहरांमधील बाजारपेठ व भाजी बाजार बंद असल्याचे चित्र होते. त्याचप्रमाणे सर्व घाऊक व किरकोळ व्यापारी दुकाने, हॉटेल व इतर दुकानदार बंदमध्ये सहभागी होते. पालघर, बोईसर येथील औद्योगिक आस्थापने सुरू राहिली. राज्य परिवहन मंडळाची सेवा तसेच रिक्षा तालुक्यात काही ठिकाणी सुरू होत्या. बोईसरची बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. राजकीय पक्षांनी रॅली काढत केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी केली होती. बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावर नागझरी येथे रास्तारोको करण्यात आला.
डहाणू, तलासरीत निदर्शने
डहाणू, तलासरीत निदर्शने करण्यात आली. डहाणूत माकपने सरकारविरोधात निदर्शने करून भाजप सरकारवर आमदार विनोद निकोले यांनी टीका केली. व्यापाऱ्यांसह, नागरिक, शेतकऱ्यांचा आंदोलनाला पुर्ण पाठिंबा असल्याचे सांगत शेतकरी, जनतेच्या आंदोलनाच्या व्याप्ती वाढत असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, कष्टकरी संघटना तसेच इतर संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जव्हार, मोखाडय़ात कडकडीत बंद
भारत बंद ला महाविकास आघाडी सरकारनेही पािंठंबा दर्शविला असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत विक्रमगड, जव्हार, मोखाडय़ातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. विक्रमगड, जव्हार व मोखाडय़ातील व्यापाऱ्यांनी बंदला पािंठंबा देत आपली दुकाने बंद ठेवली.
लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द
भारत बंदमध्ये वाडा, विक्रमगड या दोन्ही तालुक्यांत चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या व किसान सभेच्या तालुकाध्यक्षांनी केला आहे. या बंदमध्ये वाडा, विक्रमगड, कुडूस, खानिवली या प्रमुख बाजारपेठांसह गांव पातळीवरील लहान दुकानेही बंद होती. वाडा बस आगारातून सुटणाऱ्या लांब पल्लय़ांच्या सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. तर खेडोपाडय़ात जाणाऱ्या काही फेऱ्या सकाळी सोडण्यात आल्या. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांंनी बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर वाडा आगाराची सर्व बससेवा बंद करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक मधुकर धांगडा यांनी दिली.
शुकशुकाट
* मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबई आणि गुजरात वाहिनीवर अवजड तसेच प्रवासी खासगी वाहने तुरळक प्रमाणात दिसून आली. त्यामुळे चारोटी, खानीवडा तसेच दापचरी सीमा तपासणी नाक्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. सरकारी बसेस तसेच महामार्गावर पर्यायाने खाजगी प्रवासी वाहने सुरू होती.
* तलासरी बाजारपेठेसह ग्रामीण भागात पूर्णपणे बंद पाळला. व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने आंदोलनाला यश आले. सर्व प्रमुख नाक्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. महामार्गावरील सर्व हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला. वाहन दुरिस्तीसाठी गॅरेज सुरू ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आली.
* डहाणू शहरात बाजारपेठेतील दुकाने, भाजी विक्रेते यासह रिक्षा, चारचाकी खाजगी प्रवासी वाहने बंद ठेवण्यात आली. डहाणू,शहरासह वाणगाव, बोर्डी, कासा, चारोटी, आशागड, गंजाडसह, सायवन उधवा तसेच तलासरी शहरात बाजारपेठ पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. बंदमुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहणे पसंत केले.
