SSC Exam 2026: दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी काही दिवस उरले आहेत. विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवा(दि. २०) पासून सुरू होणार आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. काय आहे हा निर्णय? या विद्यार्थ्यांवर काही परिणाम होणार का? सविस्तर जाणून घेऊया.

दहावी परीक्षेआधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल केली जाणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये, तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाय

प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत कॉपी किंवा इतर अनियमितता पूर्णपणे थांबवाव्यात, असा यामागे बोर्डाचा हेतू आहे. यापूर्वी काही केंद्रांवर असे प्रकार आढळले होते. त्यामुळे आता बाह्य परीक्षकांची सरमिसळ करून विश्वासार्हता वाढवली जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना खरे गुण मिळतील आणि परीक्षा प्रक्रिया स्वच्छ राहील.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर जिल्हानिहाय प्रत्येकी दोन या प्रमाणे समुदेशकांची नियुक्ती केली आहे.
कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणारे, त्यासाठी मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.
शिवाय परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार असून संबंधित केंद्राच्या परिसरात १६३ कलम लागू राहणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी नेमण्यात आलेले विशेष पथक केंद्राच्या परिसरात लक्ष ठेवणार आहेत.