Maharashtra Board Class 10 Result 2025 Updates: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. दहावीच्या परीक्षेचा यंदाचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून या निकालांमध्ये गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकणचा निकाल यंदा सर्वाधिक लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. दुसरीकडे मुलांचा व मुलींचा विचार करता यंदादेखील मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलांपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे.

काय आहे SSC चा विभागनिहाय निकाल?

यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून कोकणचा निकाल ९८.८२ टक्के इतका लागला आहे. कोकणपाठोपाठ कोल्हापूर विभाग असून कोल्हापूरचा निकाल ९७.४५ टक्के इतका लागला आहे. कोल्हापूरपाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबई विभागाचा निकाल ९५.८४ टक्के इतका लागला आहे.

विद्येचं माहेरघर पुणे कितव्या स्थानी?

यंदाच्या दहावीच्या निकालात विद्येचं माहेरघर असणारं पुणे चौथ्या स्थानि असून पुण्यातील ९४.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुण्यानंतर नाशिक विभागाचा क्रमांक लागतो. नाशिक विभागात एकूण परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९३.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

SSC मध्ये सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा

दरम्यान, यंदा सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागात एकूण परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी दहावीच्या परीक्षेत ९०.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेवटच्या चार विभागांमध्ये अमरावती विभाग (९२.९५ टक्के), छत्रपती संभाजीनगर विभाग (९२.८२ टक्के) आणि लातूर विभाग (९२.७७ टक्के) यांचा समावेश आहे.

विभागनिहाय SSC निकाल… (सर्वाधिक ते सर्वात कमी क्रमाने)

कोकण विभाग – ९८.८२ टक्के
कोल्हापूर विभाग – ९७.४५ टक्के
मुंबई विभाग – ९५.८४ टक्के
पुणे विभाग – ९४.८१ टक्के
नाशिक विभाग – ९३.०४ टक्के
अमरावती विभाग – ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ९२.८२ टक्के
लातूर विभाग – ९२.७७ टक्के
नागपूर – ९०.७८ टक्के

किती विद्यार्थ्यांनी दिली होती SSC परीक्षा?

यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे.

इथे पाहा तुमचा SSC चा निकाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

SSC परीक्षेचे नियमित विद्यार्थी व एकूण विद्यार्थी यांची आकडेवारी वेगळी कशी?

या परीक्षेला राज्यातल्या ९ विभागीय मंडळातील नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्वांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.