Malegaon MSRTC Bus Conductor Returns Lost Money: एकदा गहाळ झालेली रोख रक्कम परत मिळणे कठीण. मात्र ‘एसटी’ याला अपवाद ठरते. एसटी बसमध्ये हरवलेले पैसे तब्बल दोन वर्षांनंतर एका वृद्ध आजीला परत मिळाल्याची अत्यंत भावुक आणि प्रामाणिकपणाची घटना समोर आली आहे. एसटीच्या एका कंटक्टरने दोन वर्षांनंतर वृद्धेला ओळखून तिची हरवलेली रोख रक्कम सुरक्षितपणे तिच्या स्वाधीन केली. राजू वाणी असे या प्रामाणिक कंटक्टरचे नाव आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एप्रिल २०२४ मध्ये ७५ वर्षीय कासाबाई गायकवाड या आपल्या आजारी पतीसह एसटी बसने प्रवास करत होत्या. सुमारे चार तासांच्या प्रवासानंतर त्या मालेगाव बस स्थानकावर उतरल्या.

दरम्यान बस शेवटच्या थांब्यावर पोहचल्यावर आणि सर्व प्रवासी उतरल्यानंतर कंटक्टर राजू वाणी आणि चालकाने बस डेपोमध्ये नेली. नेहमीप्रमाणे राजू वाणी यांनी बसमध्ये कोणाचे काही सामान राहिले आहे का? याची पाहणी सुरू केली. त्यावेळी एका सीटवर त्यांना एक छोटी पिशवी आढळून आली.

पिशवीची पाहणी केली असता त्यात २४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ‘कासाबाई गायकवाड’ या नावाने दिलेले औषधाचे प्रिस्क्रिप्शन आढळून आले. राजू यांनी संबंधित प्रवासी परत येईल या आशेने तासभर बस स्थानकावर वाट पाहिली. तसेच, विचारपूस केंद्रातही याची माहिती देऊन ठेवली. मात्र, त्या दिवशी कोणीही आले नाही.

दिवसांमागून दिवस गेले आणि तब्बल एक वर्ष उलटून गेले तरीही या पैशांवर कोणीही दावा केला नाही. राजू यांनी वैद्यकीय चिठ्ठीवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. तरीही त्यांनी ती रक्कम अत्यंत विश्वासाने स्वतःजवळ जपून ठेवली होती.

‘त्या’ ओळखपत्रामुळे झाली ओळख

दोन वर्षांनंतर राजू हे बसमध्ये नियमित कर्तव्यावर असताना एक वृद्ध महिला बसमध्ये चढली आणि तिने मालेगावचे तिकीट मागितले. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत असल्याने वय पडताळणीसाठी राजू यांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले.

त्या ओळखपत्रावरील ‘कासाबाई गायकवाड’ हे नाव वाचताच कंटक्टर राजू वाणी थबकले. त्यांनी तातडीने त्या वृद्धेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान याच त्या कासाबाई गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले. ज्यांनी दोन वर्षांपूर्वी बसमध्ये २४ हजार रुपये गमावले होते.

राजू वाणी यांनी तात्काळ कासाबाई यांना बस डेपोत नेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. योग्य ती पडताळणी केल्यानंतर कासाबाई यांच्या हक्काचे २४ हजार रुपये त्यांना सन्मानाने परत करण्यात आले.

आपले हरवलेले पैसे पुन्हा मिळतील, याची आशा उरली नसताना अचानक पैसे परत मिळाल्याने कासाबाई यांचे डोळे पाणावले. त्यांनी राजू वाणी यांच्या प्रामाणिकपणाचे आभार मानत, प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना १,१०० रुपये देऊन आपला आनंद व्यक्त केला.