धक्कादायक, बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा किटकनाशक घेत आत्महत्येचा प्रयत्न, संप चिघळण्याच्या मार्गावर

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील २५० बस डेपोंपैकी १०० पेक्षा अधिक बस डेपो बंद आहेत.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील २५० बस डेपोंपैकी १०० पेक्षा अधिक बस डेपो बंद आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांमधूनही यावर आक्रमक पाऊलं उचलली जात आहेत. बीड आगारातील संतप्त एसटी चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बीड आगारातील एसटी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळलाय. बीड येथे संपकरी चालकाने रोगर घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय. सध्या या चालकावर जिल्हा रुग्णालयात दाखल सुरू आहेत. अशोक कोकटवार असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झालीय. काही ठिकाणी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानं राज्यभर वातावरण चिघळले आहे.

दरम्यान बीड येथे संपकरी अशोक कोकटवार यांनी रोगर पिल्याने खळबळ उडाली असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

निम्म्याहून अधिक आगारांमधील कामगार एसटी संपात सहभागी

एसटी कामगारांचा संप चिघळला असून, रविवारी राज्यातील १२९ आगारांतील कामगारांनी बंद पाळला. संपाला १७ कामगार संघटनांच्या कृती समितीचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता असून, संघर्ष कामगार युनियननेही ‘संपूर्ण बंद’ची हाक दिल्याने आज, सोमवारपासून राज्यभर एसटी सेवा ठप्प होण्याची भीती आहे.

एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्याविषयी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता मुंबईत कृती समितीची बैठक होणार आहे. समितीत नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सर्व आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे. राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी करत एसटीतील छोटय़ा-मोठय़ा १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यापाठोपाठ २८ ऑक्टोबरला कामगारांनी उत्स्फूर्त संपही सुरू केला.

हेही वाचा : ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप अटळ’

परिणामी, राज्यातील ७० टक्क्य़ांहून अधिक एसटी सेवा कोलमडली. एसटी महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्याबरोबरच वार्षिक वेतनवाढ आणि विलीनीकरणाच्या मागणीवर दिवाळीनंतर चर्चेचे आश्वासन दिले. त्यामुळे समितीने उपोषण आणि संप मागे घेतला; परंतु काही आगारांमधील कामगारांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या मागणीसाठी संप सुरू केला. हे आंदोलन पसरल्याने रविवारी राज्यातील १२९ आगारांतील कामकाज बंद पडले. त्यात मुंबईतील आगारांचाही समावेश होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St bus employee attempt to suicide in beed over protest for demands pbs

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !