अलिबाग : एसटीच्या प्रवाश्यांना चक्क बनावट तिकीटांचे वाटप केल्याचा एक प्रकार रायगड जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणी बस वाहका विरोधात प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारण्याबरोबरच फसवणूकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहेअलिबाग पनवेल दरम्यान विना वाहक विना थांबा बस चालविल्या जातात. यातील प्रवाश्यांना बसमध्ये चढण्यापूर्वीच तिकीट वितरण केले जाते. यानंतर बस अलिबागवरून थेट पनवेलच्या दिशेने रवाना होते. वाटेत कुठलाच थांबा नसल्याने, प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद या सेवेला मिळत असतो. कमी वेळेत पनवेल गाठता येत असल्याने इतर गाडांऐवजी प्रवासी या बस सेवेला प्राधान्य देत असतात.
हा प्रकार १९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पावणेपाचच्या सुमारास पोयनाड येथील एसटी थांब्यावर उघडकीस आला. भरारी पथकातील तिकीट निरीक्षकांनी तिकीटांची तपासणी केली असता, दहा प्रवाश्यांना बनावट तिकीटांचे वितरण केल्याची बाब समोर आली. तिकीट मशिन मध्ये छेडछाड करून ही बनावट तिकीटे प्रवाश्यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दहा प्रवाश्यांना एकाच क्रमांकाची तिकीटे देण्यात आल्याने ही बाब समोर आली आहे. निरीक्षण अहवालानुसार या प्रवाशांची ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष तिकिटांवरील क्रमांक आणि नोंदींमध्ये तफावत आढळून आली.
.खातेनिहाय चौकशीनंतर आता या प्रकरणी थेट पोयनाड पोलीस ठाण्यात, संबधित बस वाहका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बस वाहकाने कर्तव्य बजावताना त्यांनी महामंडळाकडून देण्यात आलेल्या तिकीट वितरण मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान १० प्रवाशांना एकाच क्रमांकाची बनावट तिकिटे दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याच बरोबर या प्रवाशांकडून रोख रक्कम स्वीकारून ती स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पेण तालुक्यातील कोळवे येथील रहिवासी असलेल्या बस वाहका विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सध्या अलिबाग आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पनवेल बस आगारात विना वाहक व विना थांबा धावणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित वाहकाविरोधात फसवणूक व अपहाराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे करीत आहेत. एसटीतील बनावट तिकीटांच्या या विक्री प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात असे प्रकार अजून घडले नाहीत ना याची तपासणी करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
