सोलापूर-हैदराबाद महामार्गावर शहराजवळ दोड्डी पाटी येथे एसटी बसने ऑटो रिक्षाला ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात रिक्षातील चालकासह चौघे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हे चौघेही मृत बोरावणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आहेत. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
रिक्षाचालक दयानंद सिद्धलिंग स्वामी (२२) याच्यासह राजकुमार मुदकण्णा भाले (४५), मोहन त्र्यंबक निंबाळकर (१८) व संजय पंडित वाघमारे (२२) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक स्वामी याच्यासह चौघे जण सोलापूरजवळील पुणे रस्त्यावर बाळे येथे योगिराज करजगीकर यांच्या शेतात मजुरीचे काम करण्यासाठी नेहमीप्रमाणे रिक्षातून निघाले होते. सकाळी  गावातून रिक्षात निघाल्यानंतर अवघ्या चार किलोमीटर अंतरावर दोड्डी पाटीजवळ रिक्षाला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पंढरपूर-हैदराबाद एसटी बसने ठोकरले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांना गंभीर जखमी अवस्थेत सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता थोडय़ाच वेळात त्यांचाही मृत्यू झाला. चौघेही मृत आर्थिकदृष्टय़ा गरीब होते.
हा अपघात इतका भीषण होता, की यात भरधाव वेगातील एसटी बसने धडक देताच रिक्षा रस्त्याच्या कडेला पालथी होऊन तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.