रत्नागिरी : संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर विद्युतवाहिनी अचानक कोसळल्याने  सकाळी फणसवणे येथील उमरे फाट्यावर थरारक घटना घडली. विद्युतप्रवाह असलेली वाहिनी बसवर पडल्याने वाहकाला विजेचा जोरदार धक्का बसून किरकोळ दुखापत झाली, तर चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. बसमध्ये एकच प्रवासी असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

सकाळी सातच्या सुमारास चालक रवींद्र साप्ते हे एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी बस घेऊन संगमेश्वर बसस्थानकातून रवाना झाले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास बस फणसवणे येथील उमरे फाट्यावर रामदास मिसळ स्टॉलजवळ पोहोचली असता विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर विद्युतप्रवाह असलेली वाहिनी थेट धावत्या एसटी बसवर कोसळली.

वाहिनी बसवर पडताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा जोरदार धक्का बसला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत सीटचा आधार घेतला. त्याचवेळी विद्युतप्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. शिगवण यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, चालक रवींद्र साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने विद्युतवाहिनीच्या थेट संपर्कात येण्यापासून बचावले. त्यामुळे त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. बसमधील एकमेव प्रवासी सीटला टेकून बसला होता. त्यामुळे त्यालाही विजेचा धक्का बसला नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर लाईनमन होडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्युतवाहिनी हटवून मार्ग सुरक्षित केला. या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यातील जीर्ण विद्युत खांब, तारा आणि वाहिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विद्युत यंत्रणेची महावितरणने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी जीर्ण खांब व विद्युतवाहिन्यांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.