मुंबई : एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी अनिवार्य केलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ला (एनसीएमसी) भाजप नेते व मंत्री आशीष शेलार यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले. यातून मराठीसक्तीच्या पाठोपाठ ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रावरून भाजपने शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी केल्याचे दिसून येते. दुसरीकडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या वित्त विभागाकडे बोट दाखवत पलटवार केला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेलार यांच्या भूमिकेवर थेट प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘आतापर्यंत ९.१ कोटी प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली आहे. हे कार्ड लागू करणे आवश्यक आहे, अन्यथा एसटीच्या अनुदानातून वित्त विभाग वारंवार अडचणी निर्माण करेल. नोंदणीत तांत्रिक अडचणी येत असतील तर त्या नक्कीच दूर करू आणि आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते आशीष शेलार यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी परिवहन मंत्री म्हणून आधी माझ्याशी चर्चा केली असती, तर तेव्हाच सामोपचाराने तोडगा निघाला असता,’’ असे सरनाईक म्हणाले.

शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बसमधून प्रवास करताना एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात आली असून, कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जात असल्याची बाब निदर्शनास आली. ऐन गौर-गणपती उत्सवाच्या काळात महिला, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद साधून या कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश दिले आहेत. – आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री