कारवाईच्या भीतीने विष प्राशन करणाऱ्या ‘त्या’ ३१ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादम्यान मृत्यू

१६ नोव्हेंबर रोजी त्याने विष प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादम्यान त्याला मृत्यू झाला

ST Worker
मागील दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या एसटी संपावर कोणताही तोडगा निघत नसल्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादारम्यान मृत्यू झाला आहे. खामगांव आगारातील एसटी कर्मचाऱ्याने नैराश्येमध्यून १६ नोव्हेंबर रोजी विष प्राशन केलं होतं. दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याची मृत्यूशी सुरु असणारी झुंज अपयशी ठरली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २०० च्या जवळपास कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. कारवाईचे सत्र एसटी महामंडळाकडून सुरू असताना आपल्यावरही निलंबनाची पाळी येईल या भीतीपोटी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी झालेल्या खामगाव एसटी आगारातील सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबलकरने दोन दिवसापूर्वी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आपल्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

नक्की वाचा >> सोलापूर: जीप अपघातात पाच ठार; “सरकारी हेकेखोरीमुळे ST संप, महाविकास आघाडीच्या काळात सामान्यांचं मरण स्वस्त झालंय”

३१ वर्षीय विशालने विष प्राशन केल्याचं उघड झाल्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती खालावत असल्याने नंतर त्याला अकोला येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वी आपण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व राज्य शासन यासंदर्भात कुठलीही निर्णय घेत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे परिवारातील सदस्यांना सांगितले होते. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विशालच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त करतानाच प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> “एसटीच्या प्रत्येक प्रवाश्यांवर आकारला जाणारा एक रुपया याप्रमाणे महिन्याचे २१ कोटी ‘मातोश्री’वर जातात”

आज सकाळी विशालचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आला आहे. याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत ४० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St employee attempted suicide in buldana died during treatment scsg

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या