एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल

एसटी संपामुळे तीन महिन्यांपासून पगार नसल्याने वडिलांनी मुलाला खर्चासाठी पैसे दिले नाहीत.

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार हळूहळू कमी होत असताना अद्यापि काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. अशाच एक संपकरी कर्मचाऱ्याच्या तरुण मुलाने आर्थिक विवंचनेमुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली. एसटी संपामुळे तीन महिन्यांपासून पगार नसल्याने वडिलांनी मुलाला खर्चासाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळेच मुलाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे.

अमर तुकाराम माळी (वय २०, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील तुकाराम माळी एसटी कर्मचारी असून ते गेल्या तीन महिन्यांपासून एसटी संपात सक्रिय आहेत. त्यामुळे मासिक वेतनही थकल्याने त्यांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. बारावी शास्त्र शाखेत शिक्षण घेतलेला मुलगा अमर याने खर्चासाठी वडिलांना पैसे मागितले होते.

तीन महिने संपामुळे पगारच न झाल्यामुळे पैसे कुठून देऊ, असे वडील म्हणाले होते. नंतर वडील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी निघून गेले. तर इकडे घरात मुलगा अमर याने आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेमुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St employee son commits suicide an extreme step out of financial difficulties akp

Next Story
बीड उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यासह खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी