महेंद्र दळवींच्या मध्यस्थीनंतर एसटी कर्मचारी कामावर

आमदार दळवी यांनी हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वसनही दिले आहे.

अलिबाग- आमदार महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीनंतर अलिबाग आणि मुरुड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी आपला संप मागे घेतला. त्यामुळे दोन्ही आगारातून एसटी वाहतुक पुर्ववत झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार दळवी यांनी हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वसनही दिले आहे. तसेच कर्मचाऱ्यांवर कोणतीही करवाई केली जाणार नाही असे आश्वासनही जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यानी दिले आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी हे कामावर रुजू झाले असून एसटी वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय नियमाप्रमाणे सामावून घ्या, महामंडळाचे विलगिकरण करा या मागण्यासाठी ऐन दिवाळीत संप पुकारला. अलिबाग आगारासह माणगाव, मुरुड, कर्जत, श्रीवर्धन येथील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. माणगाव, कर्जत, श्रीवर्धन आगारातील कर्मचारी हे कामावर रुजू झाले मात्र अलिबाग आणि मुरुड येथील कर्मचारी हे संपाबाबत ठाम राहिले. त्यामुळे या आगारातून गावी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

अखेर शनिवारी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी फोनवर कर्मचाऱ्याच्या मागणी त्यांच्या कानावर घातली तसेच यातून मार्ग काढण्याची विनंती केली. यांनतर अलिबाग आणि मुरुड आगारातून एसटी ची प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांनीही निश्वास सोडला.

एसटीचे ७६ लाखांचे नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रायगड जिल्ह्यत एसटीचे सुमारे ७६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या वाहतुकीतून दररोज सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. जवळपावस तीन दिवस एसटी वाहतुक ठप्प होती. त्यामुळे तीन दिवसात एसटीचे जवळपास ७६ लाखांचे उत्पन्न बुडाल्याचे एसटीच्या विभागिय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: St staff ready to return at work after mahendra dalvi mediation zws