साताऱ्यातील मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा मागील दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच साताऱ्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेढा एसटी डेपोतील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

संतोष वसंत शिंदे (वय ३४, रा. आसगाव ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष शिंदे हे मेढा एसटी डेपोचे कर्मचारी असून तुटपुंजा पगार व संपामुळे ते तणावाखाली होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संप कर्मचाऱ्यांच जीवावर बेतला आहे.

संतोष शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. तीन वर्षांपूर्वी संतोष शिंदे मेढा एसटी डेपोमध्ये रुजू झाले होते. अशातच करोनामुळे लॉकडाऊन लागल्याने परिस्थिती बिकट झाली होती. त्यातून मार्ग निघत असताना कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीमध्ये संपाचे हत्यार उपसले. यामुळे तटपुंज्या पगारात जगायचे कसे या विचाराने संतोष शिंदे हताश झाले होते. अशातच गेल्या आठ दिवसापासून ते तणावाखाली होते.

मंगळवारी मध्यरात्री संतोष शिंदे यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मंगळवारी रात्री साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या नवव्या दिवशी गालबोट लागले. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर क्रांतीसिंह नानापाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सामिल झालेल्या रोजंदारीवरील ३५० हून अधिक एसटी कामगारांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४ तासांत कर्तव्यावर रुजू न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

राज्यात आतापर्यंत ७ हजार ६२३ एसटी कामगार पुन्हा कामावर परतले असून ८४ हजार ६४३ कर्मचारी प्रत्यक्षात संपात सामिल झाले आहेत. कामावर परतलेल्यांमध्ये प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचाऱ्यांबरोबरच २९५ चालक आणि १३६ वाहक आहेत. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण अद्याप कमीच असून निलंबनाची कारवाईही केली जात आहे.