scorecardresearch

“…तर अजित पवारांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी”

अजित पवारांनी ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याचं निदर्शनास आणून देत त्यांच्या या वक्तव्यावरुन साधला निशाणा

Ajit pawar And Police
अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात व्यक्त केली नाराजी (फाइल फोटो)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंदर्भात कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिलेले असतानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांवर न्यायालयाच्या आदेशाच्याविरोधात वक्तव्य केल्याचा दावा केलाय. न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिलेले असताना अजित पवारांनी ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याचं निदर्शनास आणत एसटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. त्यातच आज आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला चक्कर आल्यानंतर तिथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. अजित पवारांच्या इशाऱ्यामुळे या व्यक्तीने धसका घेतल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचा दावा करत त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यात उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली.

नक्की वाचा >> “हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे, अजित पवार…”; अल्टिमेटमवरुन एसटी कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्र्यांना उत्तर

रुग्णवाहिकी नसल्याने गोंधळ…
“आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी एकाला आज सकाळच्या सुमारास चक्कर आली. मात्र या कर्मचाऱ्याला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी आझाद मैदानासारख्या महत्वाच्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नाही. अनेक लोक अन्नत्याग करुन या ठिकाणी आंदोलन करत असताना प्रशासनाने साध्या एका रुग्णवाहिकेचीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही यावरुन प्रशासनाने गोंधळ महाराष्ट्राला दिसून आलाय,” अशी टीका आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलीय. पुढे बोलताना त्यांनी, ९२ हजार कष्टकऱ्यांच्यावतीने यासाठी मी महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो,” असंही सांगितलं.

मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करा…
“अजित पवारांनी या ठिकाणी अल्टिमेटम दिलेला होता. मात्र तो संवैधानिक भाषेचं उल्लंघन करणारा होता. जर संविधानानुसार न्यायालयाने पाच तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची नाही असा आदेश दिलेला आहे. तरी अजित पवारांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणारं वक्तव्य अजित पवार यांनी काल केलं. त्याच्या धसक्याने या कर्मचाऱ्याचं काही बरं वाईट झालं तर त्यास सर्वस्वी जबाबदार अजित पवार राहतील. या कर्मचाऱ्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर अजित पवारांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी,” असंही या प्रतिनिधींनी म्हटलं आहे.

फार ताणलं आहे न्याय द्या…
तसेच पुढे बोलताना, “९२ हजार कर्मचाऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो की आता भरपूर ताणलं आहे. न्याय द्या आणि विलीनीकरण करुन द्या,” अशी मागणीही करण्यात आलीय.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंबंधी कठोर निर्णय घेतला जाण्याचे संकेत अजित पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना दिले. “३१ तारखेपर्यंत सगळ्यांना संधी द्या असं सांगण्यात आलं होतं. उद्यापासून कठोर निर्णय घेतला जाणार आहे अशी शक्यता आहे. उद्या वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलं आहे त्यांच्या जागी नवीन भरती होऊ शकते,” असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला. “समितीचा जो रिपोर्ट आला त्यातही ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच अंशी पूर्ण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. पगारही पूर्वीच्या तुलनेच बऱ्यापैकी वाढवले आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. कोर्टाने दिलेली मुदत संपली तर कठोर कारवाईचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St workers slam maharashtra deputy cm ajit pawar for commenting about ultimatum scsg

ताज्या बातम्या