राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आज परिवहनमंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थितीत होते. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.

अनिल परब म्हणाले, “आपणास माहिती आहे की गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं, अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर वेगवेगळे काया मार्ग निघू शकतात. या मार्गाच्या बाबतीत त्यांनी तपासणी केली आणि एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रूळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजना आणि आता संपकरी कामगारांच्या मागण्या यावर त्यांनी आज आमच्याशी सविस्तर चर्चा केली.”

तसेच, “आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती मागणी आम्ही त्यांना दिली. यावर त्यांनी देखील सर्व माहिती अभ्यास केला आणि याबाबत वेगवेगळे पर्याय कशा पद्धतीने तयार करता येतील किंवा कशा पद्धतीने यातून मार्ग काढून कामगारांचं आणि जनतेचं समाधान करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा आज आमच्यसोबत झालेली आहे.” अशी देखील यावेळी परब यांनी माहिती दिली.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा –

याचबरोबर, “विलीनीकरणाचा जो मुद्दा आहे हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे या समितीसमोर सरकारने देखील आपली काय बाजू मांडावी? याबाबत देखील चर्चा झाली. परंतु विलनीकरणाचा जो मुद्दा आहे यावरच जो अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारू. फक्त हा अहवाल उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातूनच येईल. त्यामुळे विलनीकरणाचा जो विषय आहे हा या समितीच्या माध्यामातून येईल. परंतु सकारात्मक काय आपली बाजू मांडली पाहिजे, कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांचा आज सविस्तर विचार आणि चर्चा आज आम्ही केली आणि वेगवेगळे त्याला पर्याय तयार केले आहेत की कशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो.” अशी देखील चर्चा झाली असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले.