मुंबई: संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच असून ही संख्या तीन हजारांपार गेली आहे. मंगळवारी ८५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महामंडळाने आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान, विलिनीकरण आणि अन्य मागण्यांसाठी पहिल्या बंद झालेल्या सांगली विभागातील आटपाडी आगारातूनही वाहतूक सुरू झाली असून या आगारातून तीन बस सोडण्यात आल्या. परंतु त्या रिकाम्याच धावल्या. राज्यात दिवसभरात विविध भागातून २३६ बस सुटल्याची माहिती महामंडळाने दिली.

निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या सोमवारी २ हजार ९६७ होती. यात मंगळवारी काहीशी वाढ झाली. ही संख्या ३ हजार ५२ पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत ६४५ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. संप कालावधीतील वेतनही न देण्याचा महामंडळाचा विचार आहे. दरम्यान राज्यातील काही भागातून धावणाऱ्या एसटीची संख्या वाढली आहे. सोमवारी १९७ बस सोडण्यात आल्या असून त्यातून ४ हजार ८४८ प्रवाशांनी प्रवास केला होता. मंगळवारी मात्र २३६ बस सोडण्यात आल्या तर ४ हजार २२७ प्रवाशांनी प्रवास केला. यात संपकाळात बंद झालेल्या सांगली विभागातील आटपाडी आगारातील वाहतूकही सुरू झाली. आटपाडी ते भिवघाट अशा तीन गाडय़ा धावल्या.