सावंतवाडी :सिलिका मायनिंग लॉबीने कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसराची अवस्था गाझापट्टीसारखी केली असून, शेती, बागायती आणि नद्या प्रदूषित होत आहेत. ही भयावह स्थिती लक्षात घेता, या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. तसेच, ‘मायनिंग मुक्त सिंधुदुर्ग’साठी आमचा लढा असेल, अशी माहिती पर्यावरणवादी चळवळीतील तज्ञ स्टॅलिन दयानंद यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत दिली.
विजय भवनमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेला ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, आणि कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री आदी उपस्थित होते.
स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले की, कासार्डे परिसरात अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि अवैधपणे सिलिकाचे उत्खनन सुरू आहे. या बेकायदेशीर उत्खननाचा आसपासच्या शेतजमिनींवर आणि शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच, या भागात मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषणही होत असून, त्याची त्यांनी स्वतः पाहणी केली आहे. जलप्रदूषणाचा परिणाम आसपासच्या भागावर मोठ्या प्रमाणावर होत असून, याबाबतचे सर्व पुरावे आपण गोळा केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अवैध उत्खननामुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान कधीच भरून काढता येणार नाही, असे स्टॅलिन दयानंद यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात अधिकारी कागदपत्र न पाहता, ‘काही होईल ते नंतर पाहू’ अशी भूमिका घेऊन सह्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी २०१३ पासून कासार्डे मायनिंगची पाहणी केल्याचा कोणताही अहवाल उपलब्ध नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. हे प्रकार चालू दिले जाणार नाहीत आणि ते थांबवले जातील, असा इशारा त्यांनी दिला.
पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे. अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास होत नाही. मायनिंग हे विकासाचे मॉडेल असता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. सर्वच राजकीय पक्षांना मायनिंगला विरोध नको असतो. मात्र, आमचा विरोध हा सरसकट मायनिंगला नसून, अनधिकृतपणे चालणाऱ्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या मायनिंगला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, यामध्ये अशाप्रकारे अवैध मायनिंग चालवू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या संदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लवकरच कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असेही स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.