अहिल्यानगर: महापालिका स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सदस्यांची निवड आज, गुरुवारी महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत करण्यात आली. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपने मातब्बरांना संधी दिली. आता ‘स्थायी’च्या सभापतीसाठी भाजपमधील सुभाष लोंढे व निखिल वारे या दोन विखे समर्थकांत रस्सीखेच निर्माण झाली आहे. महिला व बालकल्याण समिती राष्ट्रवादीकडे जाणार असून सभापतीपदी दिपाली बारस्कर किंवा अनिता शेटीया यांची नावे दावेदार ठरत आहेत.

भाजपचे सुभाष लोंढे व निखिल वारे हे दोघेही अलीकडेच पक्षात आलेले आहेत. दोघेही विखे समर्थक म्हणून गणले जातात. त्यामुळे सभापती पदासाठी विखे समर्थकांमध्येच लढत होण्याची शक्यता आहे. हा तिढा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी खासदार डॉ. सुजय विखे कसा सोडवतात याकडे लक्ष राहणार आहे. दरम्यान,महासभेत स्थायी आणि महिला व बालकल्याण समितीच्या प्रत्येकी १६ सदस्यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, नगरसचिव मेहेर लहारे आदी उपस्थित होते. सभेत राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाश भागानगरे, भाजपच्या गटनेत्या शारदा ढवण, शिवसेनेचे (शिंदे गट) गटनेते दत्ता कावरे, एमआयएमचे गटनेते सय्यद शहाबाज व काँग्रेसचे गटनेते शम्स खान यांनी त्यांच्या पक्षाच्या संख्याबळाप्रमाणे दोन्ही समित्यांवरील सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौरांकडे दिली.

स्थायी समितीचे सदस्य- गौरी बोरकर, हरप्रीतकौर गंभीर, सुरेश बनसोडे, संध्या पवार, मीना चोपडा व पौर्णिमा गव्हाळे (सर्व राष्ट्रवादी). सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुलम, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे (सर्व भाजप). नवनाथ कातोरे व सुनिता गेनप्पा (शिवसेना). शेहनाज शेख (एमआयएम), मिनाज खान (कॉंग्रेस).

महिला व बालकल्याण समिती सदस्य- दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेटीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, आश्‍विनी लोंढे ( सर्व राष्ट्रवादी ). वंदना ताठे, शीतल ढोणे, पुष्पा बोरूडे, आशा कातोरे, रोशनी त्र्यंबके व वर्षा सानप (सर्व भाजप). मंगल लोखंडे, रुपाली दातरंगे (शिवसेना). शेहनाज शेख (एमआयएम) व मिनाज खान (कॉंग्रेस).

कॉंग्रेस गटनेत्याच्या विलंबाचे कारण काय?

भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ६, शिंदे शिवसेना २, काँग्रेस व एमआयएमला प्रत्येकी १ सदस्य नियुक्त होणार होते. मात्र काँग्रेसचे गटनेते शम्स खान अनुपस्थित होते. त्यामुळे रिक्त १६ व्या सदस्याची निवडीचा अधिकार महापौरांना देण्याचा ठराव निखिल वारे यांनी तातडीने मांडला. प्रकाश भागानगरे यांनी अनुमोदनही दिले व आयुक्तांकडे महापौरांना १६ व्या सदस्य निवडीचा अधिकार देण्याचा आग्रह धरला. परंतु आयुक्त यशवंत डांगे यांनी असे करता येणार नाही, प्रत्येक पक्षाचा ‘कोटा’ ठरला आहे. त्यामुळे ही जागा रिक्त ठेवून पुढच्या सभेत ती भरावी लागेल, असे स्पष्ट केले.

त्यावरून आयुक्त व नगरसेवक यांच्या तावातावाने चर्चा सुरू असतांनाच अचानक चर्चा गप्प झाली. काँग्रेस गटनेते शम्स खान यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यांना तातडीने सदस्याचे नाव महापौरांकडे देण्यास सुचवले. ते लगबगीने महापौरांकडे जाताना काँग्रेस गटनेते आले… असा आवाज दिल्याने चर्चा थांबली. मात्र कॉंग्रेस गटनेते सभागृहात विलंबाने येण्याचे कारण काय, याचीच चर्चा होत होती.