नाशिक - अधिवेशन सुरू असल्यामुळे लगेच काही आश्वासन देता येणार नाही. दौऱ्याच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागातील स्थिती जाणून घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ती मांडली जाईल. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. अवकाळीच्या संकटात शेतकरी सापडला असताना मुख्यमंत्री भाषणे ठोकण्यात मग्न असून त्यांच्यासह इतर मंत्र्यांना बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास वेळ नसल्याचे टिकास्र ठाकरे गटाने सोडल्यानंतर सत्ताधारी शिवसेना अर्थात शिंदे गट खडबडून जागा झाला. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल झाले. हेही वाचा - नाशिक : अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार चंद्रपूरच्या वैशाली गेडाम यांना जाहीर निफाड तालुक्यातील कुंभारी येथे नुकसानग्रस्त द्राक्षबागांना भेट देत सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अंधारात सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अवकाळी पावसाने द्राक्षाचे पीक मातीमोल झाले. या पिकासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे पीक संरक्षण योजना लागू केली असती तर ही वेळ आली नसती, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. कर्ज, मुलांचे शिक्षण, लग्न अशा वेगवेगळ्या अडचणी समोर असताना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. हेही वाचा - नाशिक : आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या बालिकेची हत्या दरम्यान, ठाकरे गटाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी अवकाळीच्या संकटात शेतकऱ्यांवर बिकट स्थिती ओढवली असताना सत्ताधारी मंत्री सभा, भाषणांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला होता. शासनाच्या उदासिनतेकडे त्यांनी लक्ष वेधले होते. या टिकेनंतर मंगळवारी कृषिमंत्री बांधावर पोहोचले. परंतु, बांधावर पोहोचण्यात त्यांना अंधार झाल्याने सत्तार यांनी अंधारात नुकसानीची काय पाहणी केली असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे