राज्यभरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोकणातही भातशेतीला परतीच्या पावसाचा फटका बसलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना, एका विधानामुळे चर्चेत आले आहेत.

कांदा खायचा असेल तर ५०-६० किलो दराने घेऊन जा. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणीही मरत नाही, विनाकारण ओरड थांबवा ! असं संतप्त मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं आहे. ते निफाड तालुक्यातील कोळवाडी येथील गावात शेतीच्या नुकसानीची पाहणी करायला गेले होते. “परतीच्या पावसाने यंदा कांद्याला मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रुपये किलो दराने खावा लागला, तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही.” TV9 मराठीने वृत्तवाहिनीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

परतीच्या पावसाने निफाड तालुक्याला सोमवारी अक्षरशः झोडपून काढले आहे. यात द्राक्षबागा, कांदा, भुईमूग, बाजरी, मका, सोयाबीन या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत शुक्रवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी निफाड तालुक्यातील कोळवाडी येथील कोंडाजी पुंजा शिंदे या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यंदा पावसाने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे कांदा लागवड क्षेत्रही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेची कांद्याबाबतची मागणी लक्षात घेऊन पुरवठा करण्याचे धोरण शासनातर्फे राबवले जाईल. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असंही आश्वासन सदाभाऊ खोत यांनी दिलं.