scorecardresearch

स्टेट बँक फसवणूक प्रकरणात आठ कर्जधारकांसह बनावट आयकर कागदपत्रे तयार करणाऱ्याला अटक

आरोपींची एकूण संख्या २३ ; बँक अधिकारी फरार, तीन अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

man-arrested
(प्रातिनिधीक छायाचित्र)

भारतीय स्टेट बँकेतील १४ कोटी २६ लाखाच्या फसवणूक प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा आठ कर्जधारकांसह बनावट आयकर कागदपत्रे तयार करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. या सर्वांची एक दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सर्व आरोपी मजूर वर्गातील आहेत. ५० हजार ते एक लाखाचे आमिष दाखवून आधारकार्ड घेवून त्यांच्या नावावर कर्ज उचलले गेले आहे. तर आयकर सल्लागार दाम्पत्याचे नाव चर्चेत आहे. बनावट आयकर कागदपत्रांसह ओळखपत्रे तयार करून देणाऱ्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात बँकेचे एकूण ११ अधिकारी सहभागी आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारावर गृहकर्ज देवून बँकेला १४ कोटी २६ लाखाचा चुना लावल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत २३ जणांना अटक केली आहे. यामध्ये बँकेच्या तीन अधिकाऱ्यांसमवेत १२ कर्जधारक व एजंटचा समावेश होता. शुक्रवारी आणखी मजूर वर्गातील आठ कर्जधारकांना अटक केल्याने या प्रकरणात एकूण २३ जणांना अटक झाली. त्यातील १५ जणांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. तर या घोटाळ्यात सहभागी बँकेचे वरिष्ठ अधिकारी फरार आहेत. यातील तीन अधिकाऱ्यानी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत.

चंद्रपूरमधील भारतीय स्टेट बँकेची बनावट आयकर कागदपत्रांद्वारे १४ कोटी २६ लाखांची फसवणूक!

या फसवणूक प्रकणात एका नामांकित बिल्डर कंपनीत भागीदार असलेल्या आयकर सल्लागार दाम्पत्याचा वारंवार उल्लेख येत आहे. ही बनावट कागदपत्रे त्यांनीच तयार केलेली असावी असा कयास आहे. दरम्यान शुक्रवारी अटक केलेल्या कर्जधारकांची नावे अशी आहेत. यामध्ये रामप्रवेश नगिनासिंग यादव (४१), चंद्रपूर, प्रकाश डोमाजी जुमडे (४२), नीलिमा प्रकाश जुमडे (३२), माया सुरेश काशेट्टीवार (४७), राजुरा, बंडू सदाशिव भगत (६०), आशिष बंडूजी भगत (३५), बंडू मधुकर लांडगे (४६), शिला बंडू लांडगे (४०) रा. भद्रावती यांचा समावेश आहे.

या आठ आरोपींमध्ये एक जण बनावट आयकर तयार करून देणारा युवक आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. सर्व आरोपी सध्या दुर्गापूर पोलीस ठाणे परिसरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांना ५० हजार ते एक लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले होते, त्यांच्याकडून फक्त आधार कार्ड घेतल्या गेले होते. आरोपी रैयतवारी कॉलरी व घुग्गुस परिसरातील आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State bank fraud case man arrested for making fake income tax documents along with eight borrowers msr

ताज्या बातम्या