स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता पाच वर्षांत न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असतानाच शिवसेनेने थेट भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी १०१ आश्वासने दिली होती. पण यातील एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नसून सर्वात आधी निवडणूक आयोगाने भाजपाची नोंदणीच रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात पक्षांकडून देण्यात आलेल्या जाहीरनाम्याची प्रत आयोगाकडे देणे बंधनकारक करण्यात आले असून सत्तेवर आल्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण केली किंवा कसे?, याबाबत जनतेला माहिती देणे बंधनकारक असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच आश्‍वासनांची पूर्तता पाच वर्षात न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होईल, असे त्यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपावर निशाणा साधला. ‘जर राज्य निवडणूक आयोगाने आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर याची सुरुवात त्यांनी भाजपापासून करायला हवी. भाजपाने निवडणुकीत १०१ आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनी यातील एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.