कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना वेळापत्रकानुसार योग्य पद्धतीने राबवण्यात याव्यात. मतदान केंद्रांची निश्चिती करताना सर्व सुविधांची पडताळणी, आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात असे निर्देश राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा येथे एका बैठकीवेळी घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
वाघमारे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्याचे आदेशही दिले. बैठकीनंतर वाघमारे यांनी करवीर तहसील कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमला भेट देऊन ईव्हीएमच्या सुरक्षिततेची आणि व्यवस्थापनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारी तसेच प्रभाग रचनेचे वेळापत्रक, मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबाबत सादरीकरण केले.