मुंबई: काटकसर काय सर्वसामान्य जनतेने करावी आणि राज्याचे मंत्री त्यांचे कार्यकर्ते यांनी उधळपट्टी करावी असा नियम आहे का राज्याचे मंत्री कसा वाहनांचा ताफा फिरवतात ते राज्यात दिसून येईल. ह्यांच्या ताफ्यामुळे शेतकऱ्यांना टॅक्टर साठी डिझेल मिळत नाही.
देशातील इंधन टंचाईवर उपाययोजना म्हणून शासकीय व खासगी वाहनांची संख्या कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाला राज्यातील अनेक मंत्री, अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नागपूर ते पोहरादेवी प्रवासात २० ते २२ वाहने वापरल्याचे आढळून आले. या ताफ्यात शासकीय व खासगी वाहनांची संख्या किती होती हे स्पष्ट झालेले नाही पण राठोड यांच्या प्रमाणे अनेक मंत्री, अधिकारी आजही वाहनांचा ताफा मिरवत आहेत.
देशातील इंधन टंचाईवरील उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या दिमतीला असलेल्या शासकीय वाहनांची संख्या निम्मी करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांनी त्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी त्यांनी त्यांच्या ताफ्यातील संख्या कमी केली आहे. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी त्यांनी मलबार हिल ते विधानभवन हा प्रवास दुचाकीवरुन केला. शासकीय वाहनांची संख्या कमी करुन इंधन बचत करत असल्याची छायाचित्र समाज माध्यमांवर टाकल्यानंतर काटकसरीच्या या मंत्राला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. पंधरा दिवसात मंत्री यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय वाहने कमी केली असली तरी मंत्र्यांच्या मागे पुढे खासगी वाहनांची संख्या जास्त आहे. मंत्र्यांचे दौरे, स्वागत, सभा यासारख्या कार्यक्रमात कार्यकर्ते त्यांच्या वाहनांची संख्या कमी करण्याचे नाव घेत नाही. नेत्याचे स्वागत दणक्यात करताना काटकसरीचा हा मंत्र पायदळी तुडवला जात आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थां मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २२ जिल्हयांचा दौरा करीत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठया प्रमाणात खासगी वाहने घेऊन हजेरी लावत आहेत.
वाहनांची संख्या वाढू नये यासाठी मंंत्र्यांचे दौरे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे मात्र हा प्रस्ताव प्रत्यक्षात आलेला नाही. राठोड यांच्या दौऱ्यात २० ते २२ वाहने होती. त्यासाठी आजूबाजूच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल डिझेल खरेदी करण्यात आले. इंधनाचा साठा केला जात असल्याचे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे पण मंत्री, नेत्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे टॅक्टरसाठी साधे डिझेल मिळेनासे झाले आहे.
