मुंबई : राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतच्या राज्य शासनाच्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवगंत अजित पवार यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातला शासन निर्णय बुधवारी निर्गमित केला आहे. अजित पवारांच्या पहिल्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे त्यांच्या ध्येयाचा शासकीय स्तरावर केलेला सर्वात मोठा सन्मान असल्याचे मानले जात आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि अजित पवार यांच्या नावाचा शासकीय जयंतीच्या यादीत समावेश करावा, असे निवेदन दिले हाेते.
अजित पवार यांच्या जयंती संदर्भातील आदेश केवळ मंत्रालयापुरता मर्यादित नाही. राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या अजित पवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्ताने २२ जुलै (बुधवार) रोजी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. शासनाच्या हा निर्णय म्हणजे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि अविरत कार्यपद्धतीला दिलेली आदरांजली आहे. दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर अजित पवारांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाईल, असे स्पष्ट करत या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना थोर राष्ट्र पुरुषांच्या शासकीय जयंती यादीमध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचा मृत्यूनंतर जयंतीचा पहिलाच कार्यक्रम ‘सेवा सप्ताह’ म्हणून राज्यस्तरावर साजरा करण्याचे नियोजन केले आहे. त्यानिमित्ताने जनतेची सेवा करण्यासंदर्भातील विविध शिबिरे पक्षाकडून भरवली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजित पवार यांच्या नावाचा समावेश थोर राष्ट्रपुरुषांच्या यादी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
