राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्त्यात वाढ करून राज्यातील युती सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटच दिली असल्याची चर्चा आहे.
या वाढीनंतर महागाई भत्त्याचा दर १०७ टक्क्यांवरून ११३ टक्क्यांवर गेला आहे. एक जानेवारी २०१५ पासून सुधारित वेतन रचनेतील मूळ वेतनावर नव्या रचनेनुसार महागाई भत्ता देण्यात येईल. १ ऑक्टोबर २०१५ पासून वाढीव महागाई भत्त्याची रक्कम रोखीने देण्यात येईल आणि १ जानेवारी २०१५ ते दि ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येईल.