मुंबई : राज्यात जाहीर झालेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकांना एकजुटीने सामोरे जाण्याचा पुनरुच्चारही महाआघाडीच्या नेत्यांनी केला.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली. बैठकी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) अनिल परब यांनी सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदा आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले.

महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी निर्णयाचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले आहेत. जिल्हा आणि विभागीय पातळीवरील जबाबदारी ठरवून दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना काही अडचणी आल्यास स्थानिक नेते एकत्र बसून निर्णय घेतील. , महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहण्याचा आणि एकजुटीने निवडणुकांना सामोरे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर काही ठिकाणी उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पुढील बैठक १९ नोव्हेंबर रोजी होईल. त्या बैठकीत राज्यभरातील अडचणीची, संघर्षाची स्थिती असलेल्या ठिकाणच्या उमेदवारीबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात आदी उपस्थित होते.

मनसे बाबत एकत्र बसून निर्णय घेऊ – शिंदे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आमच्या समोर आलेला नाही. सध्या सुरू असलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांविषयीच चर्चा सुरू आहे. मनसेकडून प्रस्ताव आल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी दिली.

चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे अपवाद

चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असेल, पण हा अपवाद आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर दोन्ही राष्ट्रवादीने आघाडी केली असेल. पण, कोल्हापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या निवडणुका महाविकास आघाडी ताकदीने आणि एकत्रितपणे लढेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.