मुंबई: राज्यातील कारागृह आणि गुन्हेगारांवर उपचार केले जाणाऱ्या शासकीय रुग्णालयात काही त्रुटी आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्यानंतर गुन्हेगारांवर उपचार केले जाणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालय तसेच कारागृहाचे येत्या सहा महिन्यात लेखा परिक्षण (ऑडिट) केले जाईल, एक दोन वर्षात सर्व आरोपींची सुनावणी कारागृहातून घेण्याची यंत्रणा उभी केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या एमआयसीयू वाॅर्डाच्या बाथरुममधून एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा पाॅक्सो गुन्हयातील आरोपी १९ जानेवारी रोजी पळून गेला. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेतल्यानंतर हा आरोपी काही तासात पोलिस ठाण्यात हजर झाला. ससून रुग्णालय हे यापूर्वी अंमली पदार्थ, खून, रक्ताचे नमुने बदलणे यासारख्या गुन्ह्यामुळे आरोपींसाठी सुरक्षित क्षेत्र झाले आहे, असा गंभीर आरोप हारून खान यांनी लक्षवेधीद्वारे केला.

या लक्षवेधीवर मोहन मते, वरुन सरदेसाई, हरिष पिंपळे, बाबासाहेब पठारे, नितीन राऊत, सिध्दार्थ शिरोळे, विकास ठाकरे, यांनी उपप्रश्न विचारले. कारागृहातून न्यायालयात अथवा रुग्णालयात आरोपींना घेऊन जाताना पोलिसांना पैसे दिल्यानंतर त्यांची बडदास्त ठेवली जाते. आरोपींना मासांहर, पान, मसाला, सिंगारेट, मोबाईल, अंमली पदार्थ, सर्व काही मिळते. त्यांचे गुन्हेगार साथीदार भेटण्याचे ठिकाण रुग्णालय आहे. तेथून मोबाईलवर खंडणी मागितली जाते.

पोलिसांच्या साक्षीने आरोपीच्या पत्नीला एकांत मिळावा यासाठी स्वंतत्र खोली दिली जाते, असे गंभीर आरोप हरिष पिंपळे यांनी केले. त्याला कदम यांनी उत्तर दिले. पुण्यातील ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याने दोषी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खाते निहाय चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पोलिसांच्या काही त्रुटी आहेत. गुन्हेगारांना रुग्णालयात नेताना यानंतर काही मार्गदर्शक तत्वे ठरवली जाणार आहेत.

एक दोन वर्षात कारागृहातून आरोपींची दृकश्राव्य माध्यमातून सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर आरोपीना न्यायालयात नेण्याचे प्रमाण कमी होईल. आरोपी पलायनानंंतर ससून रुग्णालयात कायमस्वरुपी पोलिस चौकी सुरु करण्यात आली आहे. अशीच चौकी सर्व शासकीय रुग्णालयात सुरु केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात आरोपी उपचार घेत असलेल्या रुग्णालयांचे तसेच कारागृहाचे लेखा परिक्षण केले जाणार असल्याची ग्वाही कदम यांनी दिली.