scorecardresearch

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफ लाइन सुरळीत सुरु होणार; ST बद्दल परिवहन मंत्र्यांची घोषणा

उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल, २०२२ पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

कोविड महामारीमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती परिहवन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज दिली.


उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल, २०२२ पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरु होण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.


या बैठकीनंतर परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संपामुळे गेले ५ महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर मात करत पुन्हा एसटी नव्या दमाने सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल यावेळी घेण्यात आली. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही परब यांनी सांगितले. त्यांच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप बघून शिस्त व आवेदन पद्धतीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State transport msrtc anil parab st protest high court orders vsk

ताज्या बातम्या