भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी तुकाराम मुंढे सज्ज झाले आहेत. FDA चे आयुक्त म्हणून ते धडाडीने काम करत आहेत. दुधामध्ये असो किंवा इतर अन्न पदार्थांमध्ये असो भेसळ केली जाते. ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोतच. पण समाज म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असं परखड मत तुकाराम मुंढेंनी मांडलं आहे. शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात ही मानसिकता बदलणं खूप आवश्यक आहे. भेसळ रोखायची असेल तर प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. आपला समाज हे आपलं कुटुंब आहे असं वाटून ही जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी असंही तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.

आपण काय खातो हे याकडे आपलं कटाक्षाने लक्ष हवं-तुकाराम मुंढे

आपण काय खातो? त्याकडे आपलं नुसतं लक्ष नाही तर कटाक्षाने लक्ष देणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपल्या ज्या सवयी आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या बदलल्या पाहिजेत. लहान मुलांना काही उत्पादनं विकू नयेत याचेही नियम आहेत. शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुख्याध्यापकांनी ही कारवाई करायची असते. शाळेच्या ५०० मीटरच्या परिघात ज्यावर बंदी आहे असे पदार्थ विकले जात नाहीत ना हे पाहणं त्यांचं काम आहे. तसं होत असेल तर ते तातडीने बंद करायला लावले पाहिजेत. पालक समिती असते, शिक्षकांची समिती असते. ते परस्परांना नावं ठेवतात. पालक समिती म्हणते की मुख्याध्यापक कारवाई करत नाहीत. एफडीए काहीच करत नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की एफडीएला तुम्ही सांगितलंत तर आम्ही कारवाई करुच. त्याबद्दल काही दुमत नाही. पण प्रत्येक शाळेत, प्रत्येक भागांमध्ये जाणं आम्हालाही शक्य नाही. पण प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक आहेत, पालक जात असतात. ते तिथल्या तिथे हे रोखू शकतात. त्यामुळे ही चळवळ उभी राहणं गरजेचं आहे. मला जर आयुक्त म्हणून काही मिळवायचं आहे तर ते हेच आहे की नागरिकांनी सजग राहून भेसळीच्या विरोधात एक चळवळ उभी केली पाहिजे. चांगले पदार्थ खाण्याची सवय लागली पाहिजे असं मत तुकाराम मुंढे यांनी मांडलं आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात ही मानसिकता बदलली गेली पाहिजे-तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंना पुढे हे विचारण्यात आलं की सगळे नियम असताना शाळांच्या परिघात प्रतिबंध असलेले पदार्थ विकले जातात. पोलिस कारवाई करु शकतात, मुख्याध्यापक ते बंद करु शकतात तरीही याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अगदीच सामान्य किंवा दुर्लक्षित असा का आहे? असं विचारलं गेलं तेव्हा तुकाराम मुंढे म्हणाले, ही माझी जबाबदारी नाही, असं प्रत्येकाला वाटतं. शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात हे प्रत्येकाला वाटतं. मी नाही करणार दुसरा करेल. काही गोष्टी रोखायच्या असतील पालकांना वाटतं शाळेने रोखावं. शाळेला वाटतं पालकांनी लक्ष घातलं पाहिजे आणि मुलांना असे पदार्थ घ्यायला प्रोत्साहन देऊ नये. दोघांनाही काय वाटतं की एफडीएने कारवाई करावी आम्ही काय करणार? टपरीवाला म्हणतो विकत घेणारे लोक आहेत म्हणून विकतो, मला पैसे कमावायचे आहेत. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बघतो आहे, दुसरं कुणीतरी येऊन जबाबदारी घेईल. पण त्याचा परिणाम आपल्या समाजावर होतो आहे. समाजाचीही नागरिक म्हणून जबाबदारी आहे. कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या स्वतःसाठी करायचं आहे. मी अधिकारी आहे तर मी हा विचार नाही करणार की मी आयुक्त आहे म्हणून मी माणूस पाठवतो, जी माझी जबाबदारी आहे ती मला पाळलीच पाहिजे. माणूस म्हणून कुटुंबाप्रती जशी जबाबदारी आहे, मुलांनी काय खावं ही तुमची जबाबदारी आहे. हे प्रत्येकाने केलं तर भेसळयुक्त पदार्थ विक्री बंद होऊ शकते. पण हे महाराष्ट्रातल्या १३ कोटी लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही कारवाई करायची आहे ती करुच. समाजाकडे कुटुंब म्हणून बघा, सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या कुटुंबाकडे जसं आपण जबाबदारीने पाहतो तसं समाजाकडे कुटुंब म्हणून पाहावं असं मला वाटतं अशी अपेक्षा तुकाराम मुंढेंनी व्यक्त केली आहे.