भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे. भविष्यात भाजपा व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत. या भेटीबाबत पत्रकारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी परप्रांतीयांचा मुद्द्याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही, तो पर्यंत काही सांगता येत नाही, अशी भूमिका मांडली.

“मला असं वाटतं चंद्रकांत दादांनी भेटीनंतर स्पष्ट केलं आहे. नाशिकला भेट झाली तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनी त्यांना सीडीदेखील पाठवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. युती वगैरे या विषयावर कोणतीच चर्चा झालेली नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात तरी कुणी कुणाला भेटण्यावर तरी बंधनं नाहीत. राज ठाकरे आणि आमच्या पक्षामध्ये फरक इतकाच आहे की, परप्रांतीयांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे, हा आमच्यातील समान धागा निश्चितपणे आहे. त्यामुळे दुसऱ्या मुद्द्यांचं जिथपर्यंत निराकारण होत नाही, तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही.”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे!

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबाबतही त्यांनी आपलं मत माडलं. “संपूर्ण भारताची ही मागणी होती. पहिल्यांदा हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला. त्यावेळी देखील संपूर्ण भारतातून लोकांनी ही मागणी केली होती, की मेजर ध्यानचंद पुरस्कार म्हणून संबोधित केलं जावं. ज्या काळात हिटलर जर्मनीच्या ऑलिम्पिकमध्ये असा दावा करत होता. ज्यांची सुपेरियर रेस आहे असे जर्मन लोकंच जिंकू शकतात. त्यावेळेस मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीचा ८-१ ने पराभव केला. हिटलरचा गर्व पूर्णपणे मोडला होता. किंबुहना या देशात ऑलिम्पिकला सुवर्णकाळ जर कुणी दाखवला असेल, तर मेजर ध्यानचंद यांनी. खऱ्या क्रीडापटूचं नाव अशा पुरस्काराल दिलं जात असेल, तर आपण त्याचं स्वागत करुया. हॉकीत कांस्य पदक मिळालन्यानंतर हे नाव दिलं आहे. अत्यंत चांगल्या योगावर हे नाव दिलं आहे.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.